डॉ. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा हिशोब चुकता करण्याची वेळ : विजय गवाळे

Edited by: साहिल बागवे
Published on: August 11, 2024 13:55 PM
views 143  views

कणकवली : संविधानाचा अमृत महोत्सव सुरु असतानाच काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्षांनी संविधानाबाबत राजकारण सुरु केले आहे. संविधान बदलणार असे खोटे सांगून समाजात विष पेरले जात आहे.ज्या काँग्रेसने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला.मात्र लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत बिनविरोध निवडून देण्याची गरज होती तेव्हा  निवडणुकांमध्ये याच   नेहरू आणि त्यांच्या  काँग्रेसने विरोधात उमेदवार देवून पराभव केला. अशा काँग्रेसवर विश्वास ठेवू नका तर डॉ. बाबासाहेबांच्या जो अपमान काँग्रेस ने केला आहे त्याचा पुरता  हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे.संविधान धोक्यात असल्याचे विनाकारण कोण सांगत असेल तर बाबासाहेबांची लेकरे, शिवभक्त शांत बसणार नाहीत, असा इशारा कणकवली येथील संविधान जागर सभेत  अध्यक्ष व बौद्ध युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय गवाळे यांनी दिला.

संविधान जागर यात्रा रविवारी कणकवलीत दाखल झाली. यावेळी या यात्रेचे कणकवलीत स्वागत झाले. यावेळी झालेल्या सभेत व्यासपीठावर आमदार नितेश राणे, ॲड. वाल्मीक निकाळजे, राजेंद्र गायकवाड, नितीन मोरे, योजना ठोकळे, स्नेहा भालेराव, आकाश अंभोरे, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, उपाध्यक्ष अशोक कांबळे, जिल्हा सरचिटणीस सुशील कदम, जिल्हा जिल्हाचिटणीस राजेंद्र चव्हाण, कणकवली मंडळ अध्यक्ष अजित तांबे, आदी उपस्थित होते.

जागर सभेत बोलताना अध्यक्ष  म्हणाले, १९५० साली संविधान लागू झाले. १९५१/ १९५२ मध्ये लोकसभेची पहिली निवडणूक झाली. पण, संविधान लिहिणाऱ्या डॉ.बाबासाहेबांना नेहरू आणि काँग्रेसने बिनविरोध निवडून दिले पाहिजे होते मात्र मुद्दामहून बाबासाहेबांच्या विरुद्ध उमेदवार देवून त्यावेळी पराभव केला. पुढे एका पोटनिवडणुकीत भंडाऱ्यातून बाबासाहेब  उभे राहीले तेथेही काँग्रेसने त्यांचा पराभव करून या महामानवाचा अपमान केला. त्यामुळे काँग्रेसवर कुणी विश्वास ठेवू नये आज संविधान बदलणार असे जनतेची दिशा भुल करणारी ही काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना आम्ही बुद्धिमान आहोत ही सांगण्याची वेळ आली आहे. बाबासाहेबांच्या पराभवाचा सुड घेण्याची वेळ आली आहे. असे ते म्हणाले.

माजी  पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घटनेत काही  बदल केले आणि राष्ट्रपती,न्यायाधिश,लोकप्रतिनिधी, बहुमत कायदा,सनदी आधिकरी असे सर्वांचे अधिकार काढून घेतले.नवबौध्द आरक्षण इंदिरा गांधीनी काढून घेतले.मात्र हे सर्व पुन्हा भाजपची सत्ता आली तेव्हा दिले गेले. इंदिरा गांधींनी हुकूमशही कायदे केले मात्र घटनेची मूळ चौकड कोणालाच मोडता येत नाही.जनता पक्षाचे सरकार आले तेव्हा  ४४ वी घटना दुरुस्ती करून इंदिरा गांधींनी केलेले कायदे रद्द केले. त्यामुळे काँग्रेस ने हुकूमशाहीवर आणि घटना बदलणार यावर बोलूच नये.काँग्रेसने बाबासाहेबांच्या प्रतिमेला संसदेत स्थान दिले नव्हते.बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही.  जेव्हा भाजप च्या पाठिंबा देवून  व्ही.पी. सिंग सरकार आले तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न दिला गेला.त्यामुळे संविधान बदलणार अशी भीती दाखवून काँग्रेस दलीत आदिवासी,भटके विमुक्त यांची दिशाभूल करत असल्याची टीका संविधान जागर यात्रेत कणकवली येथील सभेचे अध्यक्ष तथा बौद्ध युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय गवाळे यांनी केली.

यावेळी ॲड वाल्मीक निकाळजे म्हणाले, संविधान जागर यात्रेतून २५० संघटना देशात काही चुकीच्या व्यक्तींनी संविधानाबद्दल मांडलेल्या अपप्रचाराचा जागर करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. जगात गोबेल्सनीती रुजली आहे, त्याचा फायदा राहुल गांधी यांनी घेत संविधान बदलण्यात येणार आहे. असे म्हणत संविधानाचा अपप्रचार केला. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये खरोखरच संविधान बदलणार आहे की काय असा संभ्रम निर्माण झाला आहे.२००२ मध्ये देखील राहुल गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी हे संविधान बदलणार आहे असे सांगितले होते. त्यांनतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्याच काँग्रेसचे राहुल गांधींनी संविधान बदलणार असे चुकीचे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत संविधानात बदल केलेला नाही. आणि यापुढे देखील ते बदलणार नाहीत, असा विश्वास अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशउपाध्यक्ष  श्री. निकाळजे यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, राहुल गांधी यांना हिंदू आणि बौद्ध यांच्यामध्ये वाद निर्माण करायचा आहे. राहुल गांधी आणि परिवारातील काही मंडळींनी संविधानाची हत्या केली आहे. राहुल गांधी यांनी संविधानाचा अपप्रचार करण्यापेक्षा तुमची जात, धर्म कोणता हे जाहीर करावे. त्यांनंतरच संविधानावर भाष्य करावे. परंतु संविधानाची चौकट बदलण्याचा अधिकार कोणाला नाहीत आणि ते कोणी बदलू शकत देखील नाही असेही ते म्हणाले. 

संविधान जागर यात्रा कणकवली येथे दाखल होताच यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. या सभेदरम्यान आकाश अंभोरे यांनी प्रास्ताविक सादर केले. त्याचप्रमाणे आकाश अंभोरे, स्नेहा भालेराव, राजेंद्र गायकवाड यांनी संविधानाचे ठराव सादर केले यावेळी उपस्थितांकडून त्यांना मान्यता देण्यात आली. यादरम्यान सभेत नितीन मोरे, यांच्यासह अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योजना ठोकळे यांनी केले. संविधान गीताने संविधान जागर यात्रेचा समारोप करण्यात आला.