
कणकवली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीक्ष भूषण गवई यांच्यावर सुनावनीदरम्यान एका वकिलाने बुट फेकण्याचा प्रयत्न केला. धर्मांध मनुवादी वकिलाच्या कृत्याचा कणकवली तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाहीर निषेध केला. त्यानंतर कॉग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेत त्या वकिलाला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे, सर्वोच्च न्यायालयाला लोकशाहीतील सर्वोच्च संस्था म्हणून लोकशाहीच्या अस्तित्वातील चार स्तंभामधे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या देशाचे सर्वोच्च व्यक्तिमत्त्व आहे. सोमवारी सुनावणीदरम्यान मनूवादी धर्मांधाने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकून मारला ही या देशाच्या लोकशाही व्यवस्थेत घडलेली अत्यंत लांछनास्पद अशी घटना आहे. या घटनेतून काही तथाकथित सनातनी घटकांची असहिष्णू आणि नीच प्रवृत्ती उघड झाली आहे, जी अविचारांच्या टोकावर उभी राहून लोकशाही संवादाच्या मुळावरच घाव घालते. मतभेद मांडण्यासाठी घटनात्मक आणि सभ्य मार्ग उपलब्ध असताना अशा हिंसक कृतींचा अवलंब करणे हे केवळ कायद्याचा नव्हे तर भारतीय संस्कृतीतील संयम, संवाद आणि आदर यांच्या परंपरेचा अपमान आहे. म्हणूनच, या कृतीचा तीव्र निषेध करताना सरकारने आणि कायदा रक्षक संस्थांनी दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य पुन्हा होऊ नये यासाठी ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे. ही घटना म्हणजे तात्कालिक प्रतिक्रिया नसून एका फार मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. राज्यकर्ते पाठीशी असल्याशिवाय एखादी व्यक्ती एवढा बेदरकारपणा दाखवू शकत नाही. कायद्याचा हा सर्वोच्च अपमान भविष्यात लोकशाहीत अराजकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे समर्थक निर्माण करण्याची पूर्व तयारी आहे. म्हणूनच पोलिसांनी व राज्यकर्त्यांनी त्या इसमावर अजूनही कारवाई केलेली नाही. काय तर म्हणे न्यायालयाने तक्रार केली नाही. न्यायव्यवस्थेचा सन्मान आणि संविधानाचा गौरव टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी विवेक, संयम आणि सन्मान यांच्या मार्गावर राहणे हेच लोकशाहीचे खरे रक्षण ठरते. या घटनेचा राष्ट्रीय काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे जाहीर निषेध करत आहोत. निवेदनदेतेवेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये,अनिल डेगवेकर,प्रवीण वरुणकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, शहराध्यक्ष अजय मोरये, निलेश मालंडकर, संतोष टक्के, प्रदीपकुमार जाधव, ऊन्मेष राणे, विजय सावंत, राजेंद्र कदम, श्री.भोसले, राजू वर्णे आदी उपस्थित होते.










