'मेरी माटी मेरा देश' अभियानाचा समारोप

ढोलताशांच्या गजरात कलश यात्रा
Edited by: ब्युरो
Published on: October 07, 2023 19:43 PM
views 153  views

सिंधुदुर्ग  :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र शासनाकडून मेरी माटी मेरा देश हे अभियान राबविण्यात आलेले आहे. विकसित भारताचे लक्ष साध्य करणे व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुति देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व गावे व शहरांतील माती अमृत कलशात संकलित करून पुढे दिल्ली येथे यामातीचा वापर करून शूरवीरांच्या सन्मानार्थ अमृत वाटीकेची निर्मिती केली जाणार आहे.


         या अभियानाच्या अनुषंगाने आज नगर विकास विभाग, सिंधुदुर्ग मार्फत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगड-जामसंडे, कुडाळ, कसई-दोडामार्ग व वाभवे-वैभववाडी या आठही नगरपालिकांच्या मातीने भरलेल्या अमृत कलशांची यात्रा सिंधुदुर्ग नगरी येथे  ढोलताशांच्या गजरात उत्सवी वातावरणात संपन्न झाली. सर्व शहरांच्या अमृत कलशांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी  किशोर तावडे यांच्या उपस्थितीत सर्व कलशांतील माती जिल्ह्यास्तरीय कलशात एकत्रित करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,  मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, अपर जिल्हाधिकारी  रवि पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, जिल्हा सह-आयुक्त अजयकुमार एडके, मालवण नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी  संतोष जिरगे, सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी  सागर साळुंखे, वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकारी  परितोष कंकाळ, कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू,  देवगड-जामसंडे मुख्याधिकारी सूरज कांबळे, प्रशासकीय अधिकारी श्रीसूरज मुल्ला, लेखापाल प्रणव वालावलकर, रसिका बागवे,  एनसीसी चे लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी, सर्व नगरपालिकांचे कर्मचारी  उपस्थित होते.  


        अमृत कलश यात्रेची सुरुवात सिडको भवन येथून झाली; यात्रेत सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांच्यासह एनसीसीचे विद्यार्थी सहभागी झाले पुढे ढोलताशांच्या गजरात व भारतमातेच्या जयघोषात यात्रेचे मार्गक्रमण होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे यात्रेचे आगमन झाले. जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांच्यासह इतर मान्यवरांनी यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर सन्माननिय जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व आठही नगरपालिकांच्या अमृत कलशातील माती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अमृत कलशात एकत्रित करण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सर्व उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेऊन त्याद्वारे सशक्त भारताचे लक्ष साध्य करण्याचा प्रण घेत, मातृभूमीचे रक्षण करणाऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त केला. पुढे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले; त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होऊन आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन जिल्हा तांत्रिक तज्ञ निखिल नाईक यांनी केले.



            जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील माती एकत्रित केलेला अमृत कलश दिनांक 27 ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथे मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाठविला जाणार असून; तेथून पुढे माननीय पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास कर्तव्यपथ दिल्ली येथे पाठविला जाणार आहे.