अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर पूर्ण करा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचना
Edited by: देवयानी वरसकर
Published on: April 11, 2023 17:56 PM
views 141  views

सिंधुदुर्गनगरी : अवकाळी पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील सांगेली, सावरवाड, कलंबिस्त येथील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने युध्दपातळीवर पूर्ण करावेत. पंचनामे करताना स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने नोंदी घ्याव्यात. पंचनामे करताना सात बाऱ्यावर नोंद असलेल्या क्षेत्रातील पिकांबरोबरच फळबाग, झाडे, घर व इतर मालमत्तांच्याही नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाईचा प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावा, असे आदेश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.


सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी आज केली. यावेळी सावंतवाडी तहसिलदार अरुण ऊंडे, माजी आमदार राजन तेली, सांगेलीचे सरपंच लहू भिंगारे, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.


पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, सांगेली गावामध्ये अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गावात सुमारे  1200 घरे असून 265 सातबारा नोंद असलेले शेतकरी आहेत. यापुढील काळामध्ये अवकाळी अथवा अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्याला तातडीने मदत मिळवून देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी ई-पीक पहाणी ॲपवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद करावी. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक नोंदी करण्यासाठी अडचणी येतील त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने त्यांना मदत करावी.


कोकण विभागामध्ये प्रामुख्याने सातबारावर नोंद असणारा शेतकरी आपली शेती मेहनत करणाऱ्यांकडे, शेती कसणाऱ्यांकडे किंवा खंडाने देतो. अवकाळी किंवा अस्मानी संकटामुळे शेतीचे नुकसान झाल्यास शासनाकडून दिली जाणारी मदत ही सातबारा ज्यांच्या नावे आहे त्यांना मिळतो. अशा वेळी प्रत्यक्ष राबणाऱ्याला याचा लाभ मिळत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर कोकणासाठी याबाबत धोरण ठरविण्यात येवून प्रत्यक्ष शेती कसणाऱ्यालाही शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले. यापुढील काळामध्ये सॅटेलाईटच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचे काम शासन करीत असून नव-नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे. शेतकऱ्यांनी ऑनरेकॉर्ड यावे, असे आवाहनही त्यांनी केले.


पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगेली गावातील देवकरवाडी येथील आप्पा रेडीज, गुरुदास राऊळ यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणीही केली.