सनातन धर्माविषयी विधानं करणार्‍यांच्या विरोधात तक्रारी

Edited by: विनायक गावस
Published on: November 04, 2023 17:35 PM
views 213  views

सिंधुदुर्ग : ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करणारे उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा यांच्यासह त्यांच्या विचारांचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सनातन धर्माविषयी अवमानकारक विधाने (हेट स्पीच) केल्याविषयी भारतीय दंड संहितेनुसार आणि ‘आय.टी. ॲक्ट’ अंतर्गत तात्काळ गुन्हे नोंद करावेत अन् त्यांना अटक करावी. सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्‍यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांत देण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी उपस्थित होते.

सावंतवाडी येथे पोलीस उपनिरीक्षक गजानन भालेराव यांना धर्मप्रेमी सर्वश्री सहदेव राऊळ, वीरेश ठाकूर, अधिवक्ता वैभव चव्हाण, अंकुश गवस, सुशांत भागवत, महेश झारापकर,चंद्रकांत बिले, जीवन केसरकर, कु. वनिता काळे, कु. यशश्री टोपले  आदींनी निवेदन दिले.