नाहक त्रास देण्यासाठी तक्रार : भालचंद्र तारी

Edited by: भरत केसरकर
Published on: February 14, 2024 12:01 PM
views 589  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील कोरजाई येथील कर्ली खाडीत शासकिय जागेत अनधिकृत वाळू उत्खनन होत असलेबाबत आकासापोटी व वैयक्तिक वादातून कुरघोडी करण्यासाठी व आपणाला नाहक त्रास देण्यासाठी खोटी तक्रार सहदेव अनंत माडये, रा. परुळे कोरजाई-गाडेधाववाडी यांनी दाखल केलेली आहे. आपल्या विरुद्ध तक्रार दाखल करणारे सहदेव अनंत माडये, रा. परुळे कोरजाई-गाडेधाववाडी यांचे व त्यांचे भाऊ तसेच या भागात अन्य तीन ते चार ठिकाणी वाळूचे रॅम्प असलेले सर्वचजण बेकायदेशीररित्या या भागात वाळू उत्खनन करत आहेत असे म्हणणे सहदेव अनंत माडये यांचे आहे का? की आकासापोटी फक्त मला नाहक त्रास देण्यासाठी सहदेव अनंत माडये यांनी तक्रार दाखल केली आहे का? असा प्रश्न भालचंद्र तारी यांनी उपस्थित केला आहे.तर याची दखल घेवून वेंगुर्ले तहसिलदार यांनी खोटी तक्रार दाखल करणारे सहदेव माडये यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भालचंद्र तारी यांनी वेंगुर्ले तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटलय की,आपल्या विरोधात आकसापोटी खोडसाळ तक्रार दाखल करणारे तक्रारदार सहदेव माडये यांनी मुळात शासनाची फसवणूक करुन कांदळवनाची बेकायदेशीर तोड करुन नारळाची रोप लागवड केलेली आहे. तसेच शासनाच्या म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजनेतून मालकांची कोणतीही संमत्ती न घेता फळबाग लागवड (आंबा कलम) व सिचंन विहीर या योजनाचा लाभ घेतला याबाबत त्यांनी शासनाला खुलासा करावा अशी मागणी भालचंद्र तारी यांनी केली आहे.

सहदेव माडये यांच्याकडे सद्यस्थितीत एक होडी आणि दोन डंपर आहेत. ते याचा वापर करुन अनधिकृत वाळू उपसा करतात अशी खोडसाळ तक्रार कोणीही केल्यास सहदेव माडये यांना मान्य होईल का?असा सवाल भालचंद्र तारी यांनी उपस्थित केला आहे.केवळ वैयक्तिक वादातून आकसापोटी आणि अश्या तक्रारी दाखल करुन आपल्याकडून काही आर्थिक अपेक्षा ठेवून आपणाला आणि प्रशासनास वेठीस धरण्यासाठी आपल्या विरुद्धात तहसिलदार यांच्याकडे खोटी तक्रार केलेली आहे.

आपले  वय वर्ष ७७ असून आपली तब्येत वारंवार बरी नसल्यामूळे माझ्या जीवितास  धोका निर्माण झाला तर सहदेव माडये हेच जबाबदार असतील असा थेट इशारा भालचंद्र तारी यांनी दिला आहे.याबाबतचा तक्रार अर्ज भालचंद्र तारी यांनी वेंगुर्ले तहसिलदार यांना देत सहदेव माडये यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.