शिंदे सेनेच्या जिल्हाप्रमुखांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Edited by:
Published on: July 28, 2025 14:19 PM
views 356  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात मोठ्या राजकीय उलथापालथी सुरु असताना महायुतीमधील अजून धुसफूस समोर आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शिंदे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, या पत्राने महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप भाजप सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष  प्रभाकर सावंत यांनी केला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढून त्याचा फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

सावंत यांनी आपल्या वरिष्ठ नेतृत्वाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महायुतीचा धर्म पाळत भाजपने जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयासाठी खूप मेहनत घेतली. मात्र, निवडून आल्यानंतर शिवसेनेचे वरिष्ठ जिल्हा पदाधिकारी भाजप कार्यकर्त्यांचा योग्य तो आदर राखत नाहीत. कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकारी भाजप कार्यकर्त्यांना वैयक्तिक प्रलोभने आणि सार्वजनिक कामांची आश्वासने देऊन पक्षप्रवेशासाठी उद्युक्त करत आहेत.


यापूर्वीही अनेकदा याबाबत शिवसेनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांमार्फत सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही असे प्रकार सुरूच आहेत. पंतप्रधानांच्या 'विकसित भारत' स्वप्नासाठी 'पार्लमेंट ते पंचायत तक' आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येणे आवश्यक असताना, स्थानिक पातळीवर शिवसेनेकडून होणारे हे प्रयत्न महायुतीसाठी घातक ठरू शकतात, असे भाजपने म्हटले आहे.


जिल्ह्यात भाजपचे संघटन मजबूत असून, शिवसेना ज्याप्रमाणे भाजप कार्यकर्त्यांचे प्रवेश घेत आहे, त्यापेक्षा दुप्पटीने आम्ही त्यांच्याकडील कार्यकर्त्यांचे प्रवेश घेऊ शकतो, असेही निवेदनात नमूद आहे. मात्र, युतीचा धर्म पाळण्यासाठी भाजप संयम राखत आहे. शिवसेनेच्या या धोरणामुळे भाजपच्या स्थानिक बैठकांमध्ये कार्यकर्त्यांकडून 'स्वबळाचा' आग्रह वाढत असून, त्यांना आवरणे कठीण होत असल्याचे सावंत यांनी  पत्रात म्हटले आहे.

या प्रकरणी प्रदेशाध्यक्षांनी तातडीने लक्ष घालून संबंधित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पक्षप्रमुखांमार्फत योग्य त्या सूचना देण्याची विनंती केली आहे.