
सावंतवाडी : सावंतवाडी आगारातून पहाटे गोव्याकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेस वेळेवर सुटत नसल्याच्या तक्रारीवरून सावंतवाडी युवासेना तालुकाधिकारी प्रतिक बांदेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने स्थानक प्रमुख राजाराम राऊळ यांना जाब विचारला.
सावंतवाडी एसटी बस आगारातून सकाळी ६:१५ ते ९:०० या वेळेत गोव्यासाठी सुटणाऱ्या एसटी बसेस नियमितपणे उशिरा धावत आहेत. यामुळे गोव्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि नोकरीसाठी जाणारे कर्मचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. युवासेनेने या गैरसोयीबाबत एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. युवासेनेने मागणी केली आहे की, सावंतवाडीतून म्हापसा आणि पणजीसाठी सुटणाऱ्या एसटी बसेस वेळेवर सोडण्यात याव्यात. अन्यथा, येत्या आठ दिवसात बसेस वेळापत्रकानुसार न सुटल्यास आगार व्यवस्थापकांना पुन्हा जाब विचारला जाईल, असा इशारा प्रतिक बांदेकर यांनी दिला आहे.
यावेळी युवासेनेचे अर्चित पोकळे, रोहित पोकळे, संजय पालकर, शरद सावंत, बाबू जाबरे, शैलेश तळवडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.