सावंतवाडीमधील स्पर्धा परीक्षा केंद्र ओरोसमध्ये नेण्याचा घाट ! - माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांचा आरोप

‘आय टी’ तज्ज्ञाला गुरांतलं काय कळणार…?
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 03, 2023 16:37 PM
views 166  views

सावंतवाडी : जिल्हा नियोजनमधून लाखो रूपये खर्चून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सावंतवाडी जिमखाना येथे सुरू करण्यात आलेले स्पर्धा परीक्षा केंद्र ओरोस येथे नेण्याचा घाट घातला जात आहे. सेट-टॉप बॉक्स, नोकऱ्यांच्या आश्वासनानंतर आता आणखी एक फसवणूक सावंतवाडीकरांना भोगावी लागणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात याबाबत नक्कीच जाब विचारला जाईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला. 

दरम्यान, ज्या व्यक्तीला गाई-गुरांमधील काहीच माहिती नाही अशा ‘आय टी’ क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञाला चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत कशी काय जबाबदारी देण्यात आली ? हा सुद्धा प्रश्न आहे. संबंधित केंद्र चालवणारे उद्योगपती चांगले काम करत आहेत. परंतु अन्य उद्योगपतींची ज्याप्रमाणे सावंतवाडीत फसवणूक झाली, तशी त्यांची होऊ नये यासाठी त्यांनी सतर्क रहावे, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत साळगावकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले, तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नियोजनमधून ३६ लाख रुपये देऊन सावंतवाडी जिमखाना मैदानावर असलेल्या बाळासाहेब प्रबोधिनी येथे स्पर्धा परीक्षा केंद्र आणण्याचे जाहीर केले होते. या ठिकाणी अनेक अधिकारी घडतील यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले होते. परंतु गेल्या काही दिवसात या केंद्रावर शुकशुकाट आहे. काही चालत नाही. तर दुसरीकडे हे केंद्र ओरोस येथे हलवण्यासाठी काही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन महिन्यात हे केंद्र त्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. त्यामुळे एक लाख सेट-टॉप बॉक्स देऊ, ओपन वायफाय देऊ, दोन हजार लोकांना रोजगार देऊ, अशा घोषणेनंतर या नव्या घोषणेला सावंतवाडीकरांना बळी पडावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी तसेच जिमखाना येथील केंद्रावर नक्की काय चालू आहे ? हे पाहण्यासाठी येत्या दोन दिवसात आम्ही पदाधिकारी त्या ठिकाणी भेट देणार आहोत, असे त्यांनी 

सांगितले.

साळगावकर पुढे म्हणाले, या ठिकाणी केंद्र चालवणारे उद्योगपती यांचे जागतिक स्तरावर सुरू असलेले काम लक्षात घेता त्यांचा आम्हाला अभिमान आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी लोकांना फसवण्याचे काम केले आहे. हे योग्य नाही. काही झाले तरी त्यांचा सावंतवाडीत नेमका जीव का घुटमळतो ? याची माहिती घेण्यात येणार आहे. यासाठी खाजगी डिटेक्टिव्ह नेमण्याची माझी तयारी आहे, असेही ते म्हणाले. या ठिकाणी लोकांची फसवणूक केली जात आहे. हा प्रकार योग्य नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत नक्कीच जाब विचारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी असलेल्या काही लोकप्रतिनिधींनी यापूर्वी काही उद्योगपतींची फसवणूक केली. त्याचप्रमाणे आताच्या नव्या उद्योगपतीची फसवणूक होणार नाही, याची त्यांनी दक्षता घ्यावी, असाही टोला त्यांनी लगावला.