शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्यांकडे आ. वैभव नाईक यांनी वेधले लक्ष..!

Edited by:
Published on: September 14, 2023 19:51 PM
views 61  views

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे महाराष्ट्र राज्य शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून आमदार वैभव नाईक यांनी याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन सिंधुदुर्ग  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समस्या व इमारतीचे रखडलेले बांधकाम,रिक्त पदे यामुळे रुग्णसेवेवर होणारे परिणाम याकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाला औषध खरेदीसाठी यावर्षी निधीची तरतूदच केली नाही लेखाशिर्ष  केलेला नाही त्यामुळे औषध खरेदी बंद आहे.  परिणामी रुग्णांना सेवा देताना अडचणी निर्माण होत आहेत. यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी  केली. त्यासंबंधीचे निवेदनही देण्यात आले. या समस्यांसंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे ना. हसन मुश्रीफ यांनी सांगितले.तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी यांनी हिवाळी अधिवेशनात लेखाशिर्ष केला जाणार असल्याचे सांगितले.मात्र तोपर्यंत वेगळी उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगितले. 

आ. वैभव नाईक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राज्य शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्यानंतर याठिकाणी एमबीबीएस अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालयाकरीता आवश्यक इमारतीचे बांधकाम देखील रखडले आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ सहित अनेक पदे अद्याप रिक्त आहेत. व्याख्यान कक्ष उपलब्ध नाही. सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाला औषध खरेदीसाठी यावर्षी निधीची तरतूदच करण्यात आली नाही. लेखाशीर्ष केलेला नसल्याने औषध खरेदी  बंद आहे.शासनाने जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित केल्याने रुग्णांना सेवा देताना  अडचणी निर्माण होत आहेत. अशा अनेक समस्यांमुळे रुग्ण निदान करणे, अपघात रुग्ण, शस्त्रक्रिया, प्रसूती आदी सेवा अद्याप रुग्णांना दिल्या जात नाहीत. स्वछतेसंबंधी पदे रिक्त असल्याने परिसरातील अस्वच्छता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

तरी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरळीत पार पाडण्याकरिता आवश्यक सोई सुविधांची तात्काळ पूर्तता करण्याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक आपल्या दालनात आयोजित करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यावर लवकरच बैठक आयोजित करण्याचे ना . हसन मुश्रीफ यांनी आ. वैभव नाईक यांना आश्वासित केले आहे.