
सिंधुदुर्ग : आडाळी येथील एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्राच्या आतापर्यंतच्या कार्यवाहीचा लवकरच आढावा घेऊ. ही औद्योगिक वसाहत लवकर कार्यरत होण्याच्या दृष्टीने व त्याठिकाणी हरित व प्रदुषणमुक्त उद्योग येण्यासाठी प्रयत्न करु, असे सकारात्मक आश्वासन आज नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले.
'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष व आडाळी एमआयडीसी स्थानिक विकास समितीचे समन्वयक सतीश लळीत यांनी आज श्री. पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. लळीत यांनी विकास समितीच्या वतीने श्री. पाटील यांना निवेदन सादर केले आणि समितीच्या वतीने चर्चा केली. तसेच समितीच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ देण्याची विनंती केली. आपण नुकतीच सूत्रे हाती घेतली असून एक एक विषयाचा आढावा घेत आहे. आडाळी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र हे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या व रोजगाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. मात्र या भागातील समृद्ध निसर्ग आणि पर्यावरण लक्षात घेऊन या ठिकाणी जास्तीत जास्त हरित उद्योग व प्रदूषणमुक्त उद्योग कसे आणता येतील, याचा आपण प्रयत्न करु, असे ते म्हणाले. श्री लळीत यांनी त्यांना आडाळी औद्योगिक क्षेत्राला भेट देऊन सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. तसेच या दौऱ्यात आडाळी येथील घुंगुरकाठी भवनलाही भेट देण्याची विनंती केली. समितीने आणि स्थानिक नागरिकांनी आतापर्यंत सातत्याने सहकार्याचे आणि संयमाचे धोरण ठेवले आहे. मात्र जमिनी खरेदी करून दहा वर्षे उलटली तरी अद्याप एकही उद्योग आडाळीत सुरू झालेला नाही. उद्योजकांना भूखंड मिळण्यास खूप विलंब होतो आहे. अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा धरण व जॅकवेल, महावितरणचे उपकेंद्र ही सर्व कामे आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. अनेक उद्योजकही या ठिकाणी उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र महामंडळाकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशी खंत श्री. लळीत यांनी बोलून दाखविली. आपण लवकरच या विषयाचा सविस्तर आढावा घेऊ, असे आश्वासन श्री पाटील यांनी दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांबाबतही श्री. लळीत यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली व सिंधुदुर्गातील कातळशिल्पे हे आपले पुस्तक त्यांना भेट दिले. युनेस्कोने जागतिक वारसास्थळाच्या प्राथमिक यादीत समावेश केलेल्या कुडोपी या कातळशिल्प ठिकाणाला आपण भेट द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. तिला श्री. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने कातळशिल्पे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पहावे. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन २.० या योजनेखाली सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन डेस्टिनेशन म्हणून जाहीर झाला आहे. त्यासाठी एका पर्यटन डेस्टिनेशन समितीची ही नेमणूक करण्यात आली आहे. या समितीची लवकरच बैठक आयोजित करावी व जिल्ह्याच्या पर्यटनाला गती येईल, असे पहावे, अशी विनंती ही श्री. लळीत यांनी डेस्टिनेशन मॅनेजमेंट समितीचे सदस्य या नात्याने केली.