CM शिंदे 6 जूनला सिंधुदुर्गात ; कुडाळात 'शासन आपल्या दारी'ला राहणार उपस्थित

सूक्ष्म नियोजन करा ; पालकमंत्र्यांच्या सूचना
Edited by: देवयानी वरसकर
Published on: June 01, 2023 20:38 PM
views 139  views

सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 6 जून रोजी कुडाळ येथे  होणाऱ्या जिल्ह्याच्या  ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करा, विशेषत: आरोग्य विभागाने सतर्क रहावे, अशी सूचना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.


            ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी 6 जून रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संभाव्य दौऱ्याच्या नियोजनाबाबत पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे आज बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे आदी उपस्थित होते.


            जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सुरुवातीला नियोजनाबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, आरोग्य मेळावा, रोजगार मेळावा, आरोग्य तपासणी ‍शिबीर याबरोबरच विविध विभागांच्या स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय वाहन तळ, उपस्थितांसाठी फूड पॅकेट, पाणी, सोबत ओ आर एसचे सॅशे, टॉयलेट आदी बाबतही नियोजन करण्यात आले आहे.


            पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले, सद्याचे ऊन आणि संभाव्य पाऊस याची दक्षता घेवून त्याबाबत काटेकोर नियोजन करा. येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य कक्ष उभा करुन सुसज्ज रुग्णवाहिका आवश्यक वैद्यकीय पथक, कर्मचारी, परिचारिका यांना तैनात ठेवा. आरोग्य विभागाने सतर्क राहून जबाबदारी पार पाडावी. येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी फिरत्या शौचालयांचीही सोय करा. खासगी वाहनांसाठी वाहन तळाची सुविधा करा तसेच अग्निशमन दलाची वाहनेही उपलब्ध ठेवा.


            उपस्थित लाभार्थी, पोलीस कर्मचारी यांना पाणी, जेवण याची सुविधा जागेवरच मिळेल याबाबतही दक्षता घ्या. सर्वच यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करावे.आवश्यक त्या सर्व सुविधा उपस्थितांना मिळतील याकडे लक्ष ठेवून हा कार्यक्रम यशस्वी करा, असेही ते म्हणाले.