रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा कमळ चिन्हावरच लढवणार : CM डॉ. प्रमोद सावंत

Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2024 05:47 AM
views 293  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी व नवभारत निर्माणासाठी आगामी ६० दिवसात भारतीय जनता पार्टीचे बुथ अध्यक्ष या नात्याने आपल्याला दिवस-रात्र काम करायचे आहे. केंद्रातील व राज्य सरकारच्या सर्व लोकोपयोगी योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. विकसित भारतासाठी कमळावर मतदान गरजेचे असून यावेळी आपल्याला भाजपच्या कमळ चिन्हावर ३७० जागा निवडून आणायच्या आहेत. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची ही जागा देखील कमळ चिन्हावरच लढवणार व जिंकणार असा विश्वास गोवा राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ क्लस्टर प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.


सावंतवाडी शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित ‘भारतीय जनता पार्टी बूथस्तरीय संमेलनात ‘ उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना डॉ. प्रमोद सावंत यांनी चैतन्य निर्माण केले. यावेळी माजी खासदार तथा कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरेगावकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बाळू देसाई आदी उपस्थित होते.


डॉ. प्रमोद सावंत यांनी अबकी बार ४०० पार व फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कधी नव्हे तेवढे भाजपला पोषक वातावरण असून हे वातावरण आपल्याला मतदानामध्ये परिवर्तित करायच आहे. कोणी कितीही व काहीही म्हटले तरीही या मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार असून एक मुख्यमंत्री येथे आला आहे त्यावरूनच काय ते समजून जा असा सूचक इशाराही त्यांनी दिला. काही जण भारत जोडो म्हणून फिरत आहेत मात्र त्यांचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. ज्या पक्षात कार्यकर्त्यांना सन्मान नाही त्या पक्षात राहण्यासाठी आता कोणीही इच्छुक नाही. भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की तिथे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान होतो. माझ्यासारखा एक बूथ अध्यक्ष मुख्यमंत्री म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. तर मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून पक्षासाठी एक पाऊल मागे येतात ते केवळ भाजप पक्षामध्येच आहे अस मत त्यांनी व्यक्त केल.