
सिंधुदुर्गनगरी : 'ते'पर्यटक खरे तर गेट-टुगेदर साठी आचरा जवळील तोंडवळी - तळाशील बीच येथे आले होते. इतक्या सुंदर नयनरम्य समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याला डाग लावणारा प्लास्टिक कचरा मात्र त्यांना दिसला. मग सगळं सेलिब्रेशन बाजूला ठेवून हा कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. बघता बघता बीच चा काही भाग चकाचक करून टाकला.
फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्वीदहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेल्या आणि आत्ता आपल्या विविध व्यवसायांमध्ये यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या किनाऱ्यावर गेट-टुगेदर साजरे केले.तोंडवली तळाशील हा समुद्रकिनारा तर नयनरम्य आहे. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे पर्यटकांची गर्दी तशी कमी होती. तरी देखील ज्यांना ही अडचण नव्हती असे पर्यटक मात्र आले होते. फोंडाघाट हायस्कूल च्या या माजी विद्यार्थ्यांनी कवडा रॉक आणि शिंपला पॉईंट येथे समुद्रात खोलवर जाऊन सफर केल्यानंतर त्यांना किनाऱ्यावर भटकताना प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर दिसला.
त्यामध्ये विशेषतः प्लास्टिक बाटल्या, मद्याच्या रिकामी बाटल्या, प्लास्टिक पाऊच, प्लास्टिक चपला, प्लास्टिक दोऱ्या, यांचा कचरा होता. हा कचरा उचलण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय झाला.त्यासाठी इतर सेलिब्रेशन बाजूला ठेवून कचरा उचलण्यासाठी वेळ देण्यात आला . राजन चिके, सुनीलदत्त सुर्वे, माधवी काळगे, निलाक्षी कोरगावकर, संगीता पावसकर, मीना पेडणेकर, प्रतिभा तायशेटे,प्रमिला तायशेटे, जयश्री ठाकूर, चंद्रशेखर कुलकर्णी, जागृती सावंत,विनोद पवार, पिंटू पारकर, राजन नानचे, संतोष सावंत, प्रसाद सातवसे भारती चीके, सुनीता तांबट आणि गणेश जेठे यांनी कंबर कसून स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी गणेश जेठे यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली.
पर्यटकांनी खरे तर कचरा अशा पर्यटन स्थळावर टाकू नये अशी प्रशासनाची, गावकऱ्यांची आणि पर्यटकांची इच्छा असते.परंतु काही पर्यटक बेमालूम पणे पर्यटन स्थळांवर कचरा फेकतात. फोंडाघाट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम पाहून इतर पर्यटकही काही प्रमाणात सहभागी झाले. विशेष म्हणजे येणारे जाणारे पर्यटक या मोहिमेचे कौतुक करत होते. सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे खूपच सुंदर आहेत .ते स्वच्छ ठेवणे ही सिंधुदुर्गवासिय आणि पर्यटकांची जबाबदारी आहे, असे मत या स्वच्छता प्रेमी पर्यटकांनी व्यक्त केले.