करूळ घाटात २ ऑक्टोंबरला स्वच्छता मोहीम | करूळ ग्रामपंचायत, पत्रकार समिती आणि सह्याद्री जीवरक्षक पथकाचा उपक्रम

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 30, 2023 19:03 PM
views 99  views

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्हयाचे प्रवेशव्दार असलेल्या करूळ घाटात २ ऑक्टोंबरला स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत करूळ,तालुका पत्रकार समिती वैभववाडी आणि सह्याद्री जीवरक्षक पथक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या मोहीमेत सर्व स्वच्छताप्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडुन करण्यात आले आहे.

करूळ घाट हे सिंधुदुर्ग जिल्हयाचे प्रवेशव्दार आहे.या घाटाला ऐतिहासीक महत्व देखील असुन पर्यटनाच्या दृष्टीने या घाटाला अन्यन्यसाधारण महत्व आहे.हजारो पर्यटक या घाटरस्त्याने प्रवास करीत असतात. सुर्यास्तदर्शनाचे नेत्रदिपक दृश्य या घाटरस्त्यातुन पाहण्याचा आनंद आगळावेगळा आहे.याशिवाय पावसाळी वाहणारे धबधब्यांची संख्या देखील चांगली आहे.त्यामुळे हा निसर्गरम्य आणि पर्यटनाला पोषक असलेला घाट स्वच्छ सुंदर दिसावा याकरीता करूळ घाटात गांधी जयंतीदिवशीच स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामपंचायत करूळ,तालुका पत्रकार समिती आणि सह्याद्री जीवरक्षक पथकाने घेतला आहे.

दहा किलोमीटर लांबीचा करूळ घाट स्वच्छ करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.या मोहीमेत तालुक्यासह जिल्हयातील सर्व स्वच्छता प्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन करूळ ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र कोलते,तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष श्रीधर साळुंखे आणि सह्याद्री जीवरक्षकचे हेमंत पाटील यांनी केले आहे.