
सावंतवाडी : भविष्य निर्वाह निधी आणि इतर मागण्यांसाठी सुरू केलेले सफाई कर्मचाऱ्यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर सर्व सफाई कर्मचारी १६ सप्टेंबरपासून पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा व जल: निस्सारण व स्वच्छता अभियंता यांचेकडून ही माहिती देण्यात आल्याचे जिल्हा माहिती कार्यायाकडून कळविण्यात आलंय.
याबाबत पत्रात म्हटलय की, सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता कार्यालयाने शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि कचरा प्रक्रिया कामासाठी एस.आर. ग्रीन वे एम्पायर, नाशिक आणि साईराज बेरोजगार सहकारी सेवा संस्था मर्यादित, मुंबई या दोन कंत्राटदारांना ठेका देण्यात आला आहे. या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी १५ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.
नगरपरिषदेने उपोषणाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरूच ठेवले. त्यानंतर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासकांनी उपोषणकर्त्यांना चर्चेसाठी बोलावले. मात्र कर्मचाऱ्यांनी चर्चेसाठी येण्यास नकार दिला व उपोषण सुरूच ठेवले. त्यानंतर, नगरपरिषदेने कर्मचाऱ्यांच्या सहा मागण्यांना मुद्देसूद उत्तराचे पत्र दिले.
त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक यांनी लोकमान्य टिळक सभागृहात उपोषणकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्याधिकारीही उपस्थित होते. बैठकीत कामगारांच्या प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व मागण्यांचे समाधानकारक निरसन करण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांमार्फत उपोषण आणि काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. १६ सप्टेंबरपासून सर्व कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.










