रामगड येथे टेम्‍पो अपघातात क्लिनर ठार

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 08, 2023 20:56 PM
views 322  views

मालवण :  कणकवली आचरा मार्गावरील रामगड येथे टेम्पो पलटी होऊन आतील क्‍लिनर ठार झाला. रवींद्र यशवंत कदम (वय ४६, रा.नाटळ बौद्धवाडी) असे मृताचे नाव आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. टेम्‍पोचे स्टेरिंग लॉक झाल्‍याने हा अपघात झाल्‍याचे चालकाकडून सांगण्यात आले.

कणकवली येथील एका एजन्सीचा टेम्‍पो (एमएच ०७ एजे २६६१) मालवण येथून कणकवलीच्या दिशेने येत होता. आचरा ते कणकवली यादरम्‍यान दुकानांना बिस्किटे आणि कुरमुरे देऊन हा टेम्‍पो रामगड सडे वहाळ पूल येथील भागात आला असता चालक हर्षल पाताडे याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तेथील छोट्या पुलाच्या संरक्षक कठड्याला आदळून टेम्‍पो पलटी याला. याच दरम्‍यान क्लिनर रवींद्र कदम हा टेम्‍पोखाली येऊन चिरडला गेला आणि जागीच ठार झाला. टेम्‍पाचे स्टेअरिंग लॉक झाल्‍याने हा अपघात झाल्‍याची माहिती चालक हर्षल पाताडे याने पोलीस जबाबात दिली आहे.

या अपघाताचे माहिती मिळतात बेळणे पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सहदेव कांबळे, पोलीस सागर कांजर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्‍यानंतर मृतदेह कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात पाठविण्यात आला. तर वाहतूक पोलीस हवालदार विकास जाधव, पोलीस काॅन्स्टेबल एम. के. शिरडे यांनी वाहतूक सुरळीत केली.