
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव बाजारपेठ येथे ट्रॅफिक मुळे झालेल्या हाणामारीत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता शिरगाव बाजारपेठ येथे घडली.
येथे ट्रॅफिकच्या कारणातून झालेल्या वादावादीचे पर्यावसन मारामारीत होवून शिरगाव बाजारपेठ येथिल दिपक गोविंद तावडे (६५) यांना प्लॅस्टिक खुर्चीने, हाताने, दगडाने, दांड्याने व मातीच्या कुंडीने त्याचा घरात घुसून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी शिरगाव येथीलच आठजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसां कडून मिळालेल्या माहितीनूसार, शिरगाव बाजारपेठे येथे राहत असलेले दिपक गोविंद तावडे (६५) आणि शिरगाव येथेच राहणारे संकेत चव्हाण (२५) यांची बाजारपेठेतच ट्रॅफिकच्या कारणावरून वादावादी होवून दोघांनीही एकमेकांना हाताच्या थापटाने मारहाण केली होती.
त्यानंतर संकेत चव्हाण यांनी आपल्यासमवेत संतोष चव्हाण (२४), सोनू मोंडकर (२८), ओंकार मोंडकर (३०), प्रमोद चौकेकर (३५), संतोष शेट्ये (३२), आर्यन दर्जी (२२), श्रेयस श्रीगरे (२६) या सातजणांना १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता दिपक गोविंद तावडे यांच्या घरी नेले. यातील आर्यन दर्जी यांने तावडे यांना त्यांचा घरातील खुर्चीने मारहाण केली तर संकेत चव्हाण, संतोष चव्हाण, सोनू मोंडकर व ओंकार मोंडकर या चौघांनी घराच्या बाजुला असलेल्या लाकडी दांड्याने मारहाण केली व प्रमोद चौकेकर, संतोष शेट्ये आणि श्रेयश श्रीगरे या तिघांनी मातीची कुंडी व दगडाने मारल्याने तावडे यांच्या उजव्या हाताच्या तळव्याला व डाव्या पंजावरील भागाला दुखापत झाली.याप्रकरणी त्यांनी देवगड पोलिस स्थानकात मारहाण केल्याची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संकेत चव्हाण याच्यासहीत सातजणांविरूध्द भारतीय न्याय संहिता ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, १३१ ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पो.हे.कॉ.महेंद्र महाडिक या अधिक तपास करत आहेत.