
कणकवली : कणकवली शहरात पटवर्धन चौकाजवळ पुलाखाली दुकाने थाटून थांबलेल्या परप्रांतीय व स्थानिक विक्रेत्यांमध्ये आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास जोरदार खडाजंगी झाली. यावेळी एका परप्रांतीय महिलेने तिच्या पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा आरोप केला. तर स्थानिक विक्रेत्यांनी एकत्र येत ही परप्रांतीय महिलाही नेहमीच भाजीचे दुकान लावल्यानंतर स्थानिकांसोबत अरेरावी करते असा आरोप केला. यावेळी त्या महिलेने मी भाजी विक्रेता संघटनेची सदस्य असल्याचा दावा केला. तर स्थानिकांनी या महिलेची रोजच अरेरावीची भाषा असते अशी भूमिका घेतली.
महिलेने आपले भाजीचे दुकान स्थानिक एकत्र झालेल्या लोकांनी विस्कटून लावल्याचा आरोप केला. या महिलेच्या पतीला कोणतीही मारहाण झाली नसून ही महिला अरेरावीची भूमिका घेऊन उद्धट वर्तन करत असते असा आरोप केला. यावेळी डीपी रोड समोर ब्रिज खाली मोठी गर्दी झाली होती. स्थानिक व्यापाऱ्यांनी या महिलेला येथे दुकान लावायला द्यायचे नाही अशी भूमिका घेतली. मात्र या साऱ्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस श्री. देसाई घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मात्र कणकवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक अनिल हळदीवे यांनी सदर महिलेने मला फोन करून कणकवली पटवर्धन चौकात ये अशी धमकी दिल्याचा आरोप केला. यावेळी या परप्रांतीय विक्रेत्यांच्याबद्दल नगरपंचायत मध्ये मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही श्री हळदीवे यांनी सांगितले. तसेच या परप्रांतीय विक्रेत्यांच्या मुजोरी बद्दल लवकरच आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा देखील श्री हळदीवे यांनी दिला. तर सदरची महिला खोटे आरोप करत असून तिच्या आसपास बसणाऱ्या विक्रेत्यांनी देखील तिच्या आरोपांना दुजोरा दिला नसल्याची माहिती समीर पारकर यांनी दिली.