दोन गटात हाणामारी | गुन्हा दाखल

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 03, 2023 12:01 PM
views 795  views

कुडाळ : गाडी पुढे घेऊन जाण्यावरून कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ६ जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली. ही मारामारी झाल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यात कुडाळ व मालवण येथील नागरिकांनी गर्दी केली होती.

कुडाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे सुशील चिंदरकर यांनी आपली चार चाकी गाडी उभी करून ठेवली होती त्याच दरम्याने मालवण येथील नितेश परुळेकर आणि त्याचे मित्र चार चाकी गाडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज नगरातून मालवणच्या दिशेने बाहेर पडण्यासाठी आले. त्यावेळी गाडी पुढे घेण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची जाऊन शिवीगाळ झाली आणि त्यानंतर दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी मालवणी येथील आनंद आचरेकर, दर्पण सादये, कुलराज बांदेकर तसेच नितेश परूळेकर यांच्यासह ७ जणां विरुद्ध सुशील चिंदरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच मालवण येथील नितेश परुळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुडाळ येथील सुशील चिंदरकर व सिंकदर अब्दुल रझाक शेख यांच्यासह ७ जणांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या मारामारी प्रकरणी अटक केलेल्या ६ जणांना न्यायालयात हजर केले असता या ६ जणांची सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली. यामध्ये महिन्याच्या प्रत्येक पहिल्या शनिवारी कुडाळ पोलीस ठाण्यात हजेरी लावणे अशा शर्तीसह प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला. कुडाळ येथील सुशील चिंदरकर व यांच्यातर्फे ॲड. सुहास सावंत व ॲड. उमा सावंत तर मालवण येथील नितेश परुळेकर आनंद आचरेकर, दर्पण सादये, कुलराज बांदेकर यांच्यातर्फे ॲड. स्वरूप पै व ॲड. अविनाश परब यांनी न्यायालयात काम पाहिले.

ही मारामारीची घटना समजतात कुडाळ शहरातील राजकीय पक्षांचे नेते तसेच इतर नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या ठिकाणी धाव घेतली त्यानंतर मालवण येथील नागरिकांनी कुडाळ पोलीस ठाणे गाठले त्यामुळे कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये गर्दी झाली होती मध्यरात्री दोन वाजेपर्यंत गुन्हा दाखल होईपर्यंत ही गर्दी तशीच होती अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर गर्दी कमी झाली.

या मारहाणीनंतर कुडाळातील काही नागरिकांनी मालवण येथील युवकांच्या गाडीमध्ये हत्यारे, दांडे इतर साहित्य होते असा आरोप केला या आरोपा नंतर कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी पोलीस ठाणे येथे सर्वांच्या समोरच पंच घेऊन गाडीमध्ये कोणत्या प्रकारची हत्यारे, दांडे किंवा इतर साहित्य आहे का? याचा पंचनामा केला मात्र गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे दांडे हत्यारे सापडून आली नाहीत.