
चिपळूण : चिपळूण शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापाऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने नगर पालिकेसमोरील काणे सभागृहात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महावितरणच्या विरोधात नागरिकांच्या भावना तीव्र होत्या. या वेळी अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीला व्यापारी संघटनेचे उदय ओतारी यांनी या बैठकीमागील उद्देश स्पष्ट केला. माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी व्यापारी आणि नागरिकांच्या समस्यांचे सविस्तर वर्णन केले. त्यानंतर अनेक नागरिकांनी थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर आपले प्रश्न मांडले. व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत उदय ओतारी यांनीही सविस्तर निवेदन सादर केले.
या बैठकीत भाजप नेते रामदास राणे, सलीम पालोजी, योगेश बांडागळे, महेंद्र कासेकर, नाहुश चितळे, माजी नगरसेवक महंमद फकीर, कांता चिपळूणकर, उमेश काटकर, अदिती देशपांडे, रिहाना बिजले आदींनी महावितरणच्या कामकाजावर अनेक मुद्दे उपस्थित केले. महावितरणचा दूरध्वनी सातत्याने बिझी राहतो, नागरिकांना नीट उत्तरे दिली जात नाहीत, अशा स्वरूपाच्या तक्रारी व्यक्त झाल्या.
यावर महावितरणचे मुख्य अभियंता श्री. माने यांनी शहरातील वीज पुरवठ्यावरील ताण, डीपी वाढविण्याची गरज, तसेच आवश्यक ते बदल यावर अभ्यास करून व्यापाऱ्यांना अखंडित वीज पुरवठा मिळेल, असे आश्वासन दिले. मुरादपूर येथील सब स्टेशनची जागा बदलण्याबाबत आपण पाहणी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तक्रारींसाठी आणखी एक दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यानंतर आमदार शेखर निकम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “महावितरण आणि नगर परिषद या दोन्हीही शासकीय संस्था आहेत. त्यांच्या परस्परांतील अडचणींचा त्रास नागरिकांना होता कामा नये. चिपळूण ही जुनी बाजारपेठ आहे. या ठिकाणी अखंडित वीज पुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने तातडीने पावले उचलावीत.”
भुयारी गटार योजनेबाबतही त्यांनी विशेष निर्देश दिले. “ही योजना शहरासाठी उपयुक्त आहे की नाही याचा अहवाल तयार करा. नागरिकांसमोर तो सादर करा. योग्य असल्यास ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर करून निधी आणू,” अशी ग्वाही आमदार निकम यांनी दिली.
स्मार्ट मीटरसंदर्भातील तक्रारींचे निरसन करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनीही काही विषयांवर विवेचन केले.
यावेळी कार्यकारी अभियंता कॅरमकोंडा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, किशोर रेडीज, आशिष खातू, सिद्धेश लाड, नगरपालिकेचे अधिकारी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.