सावंतवाडी : ख्रिस्ती बांधवांना नाताळ आणि नववर्षाची चाहूल लागली असून नाताळची लगबग सुरु झाली आहे. नववर्षाच्या स्वागतास ख्रिस्ती बांधव सज्ज झाले आहेत. नाताळच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस कॅरोल सिंगिंग सध्या सुरू आहे. ख्रिस्ती बांधव एकत्रित येऊन एकजुटीचा संदेश घरोघरी जाऊन देत आहेत. सर्वत्र नाताळचा उत्साह पहायला मिळत आहे.
शहरासह गावागावात 25 डिसेंबरला नाताळ उत्सव साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधव घरोघरी जाऊन एक अनोखा संगम साधत आहेत. सर्वत्र नाताळ सणाची लगबग पाहायला मिळत आहे. सोमवारी शहरातून फ्लोट निघणार आहे. ख्रिसमस ट्रि, गोठे घरोघरी सावराले जात आहेत. फराळासह गोड पदार्थ बनविण्याची लगबग महिलांमध्ये आहे. घराबाहेर 'चांदण्या' लागत आहेत. बाजारपेठ नाताळ सणाच्या चाहुलीने सजून गेली आहे. सावंतवाडी शहरासह कोलगाव, चराठा, कलंबिस्त , आंबोली, बांदा आदी भागातील चर्चमध्ये ख्रिस्ती बांधव जय्यत तयारी करत आहेत. ख्रिसमस मध्ये खास आकर्षण ठरणारा सांताक्लॉज सर्वांचे आकर्षण असतो. लहान मुलांना चॉकलेट, गिफ्ट तो देत असतो. लहान मुलांमध्ये त्याची एक वेगळी क्रेझ असते. अवघ्या चार दिवसांवर हा सण आल्यान ख्रिस्ती बांधवात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.