'सांज्युआंंव'...'सांज्युआंंव ; वेंगुर्ल्यात ख्रिस्ती बांधवांनी 'सांजाव' केला एन्जॉय

Edited by: दिपेश परब
Published on: June 24, 2023 20:29 PM
views 108  views

वेंगुर्ले  : डोक्याला काटेरी वेलिचे मुकूट, हातात पिडे, गळ्यात घुमट व डबे अशा पेहारावात सांज्युआंंव, सांज्युआंव घुंवता मर चा गजर करत ख्रिस्तीबांधवांनी सांज्युआंव हा सण आज (२४ जून) मोठ्या उत्साहात साजरा केला.


    आबालवृद्धांपासून सर्वांचाच सहभाग असलेला हा उत्सव म्हणून ख्रिस्ती बांधवात एक आनंदाची पर्वणीच असते. वेंगुर्ले तालक्यात सर्वत्र हा सण ख्रिस्ती बांधवांनी मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात साजरा केला. येशूख्रिस्ताच्या आगमनाची खबर घेऊन येणारा सेंट जॉन बाप्तीष्ट या संताच्या नावाने हा सण ख्रिस्ती बांधव साजरा करतात.


    ख्रिस्ती बांधवांतील शेतक-यांत मोठ्या उत्साहाने साजरे केले जाणारे हे फेस्त आता शहरी भागातील ख्रिस्ती बांधवही मोठ्या उत्साहाने एन्जॉय करतात. उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही झाल्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीस येणारा सांज्युआंव साजरा करताना वेगळाच उत्साह या ख्रिस्ती बांधवांत संचारतो.


    आज वेंगुर्ले येथे रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये या उत्सवानिमित्ताने खास प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. वेंगुर्ले शहरात कॅम्प, दाभोस, कलानगर तसेच तालुक्यातील होडावडा, उभादांडा-आल्मेडावाडी, फचिकवाडा, दाभोली, आरवली शिरोडा, रेडी या परिसरातील लोकांनी बॅन्जो, डिजेच्या तालावर नाचत मिरवणुकीने, डोक्याला हिरव्या काटेरी रानवेली गुंडाळून सज्युआंव सणाचा आनंद लुटला.