
चिपळूण : शहरातील सुप्रसिद्ध कै. वाडकर वकील यांची कन्या आणि हायकोर्टातील ज्येष्ठ विधीज्ञ सौ. दिप्ती वाडकर शिरसाट यांचे पती जस्टिस श्रीराम शिरसाट यांची हायकोर्टात ॲडिशनल जज म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे चिपळूणकरांसह संपूर्ण कोंकणात अभिमान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यायालयीन क्षेत्रातील आपल्या अनुभव, अभ्यासू वृत्ती आणि न्यायनिष्ठ कामगिरीच्या जोरावर त्यांची ही नियुक्ती झाली असल्याचे मानले जाते. न्यायसंस्थेतील एक महत्त्वपूर्ण पद भूषविण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
चिपळूणशी घट्ट नाळ जोडलेल्या या कुटुंबातील जावई उच्च न्यायालयाच्या न्यायासनावर विराजमान झाल्याचा अभिमान स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. विविध सामाजिक व विधिज्ञ वर्तुळातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.