
चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित १६ वर्षाखालील शालेय स्तरावरील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे सोमवारपासून पवन तलाव मैदानावर जोरदार उद्घाटन झाले. युवा नेते अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते सकाळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी असोसिएशनतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. दरवर्षी राज्यस्तरीय सीझन बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. गेल्या तीन वर्षांपासून शालेय स्तरावरील स्पर्धांनाही मोठा प्रतिसाद मिळत असून, यंदाही या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील एकूण १० संघांनी सहभाग नोंदवला आहे.
उद्घाटनप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, सचिव राजेश सुतार, गोट्या भोसले, दादा लकडे, लतीफ परकार, संदेश गोरीवले, योगेश बांडागळे, सुनील रेडीज, सचिन कुलकर्णी, भाऊ देवरुखकर, उदय काणेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष दाभोळकर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात गेल्या चार वर्षांत सीझन बॉल स्पर्धेला मिळालेल्या यशाचा आढावा घेतला आणि शालेय स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यासपीठ मिळत असल्याचे नमूद केले.
अनिरुद्ध निकम म्हणाले की, आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून पवन तलावासोबतच ठरवते येथे अडीच एकर परिसरात दर्जेदार क्रिकेट मैदान उभारणी पूर्णत्वास पोहोचली आहे. मेरी माता स्कूल आणि अलोरे हायस्कूल यांच्यात उद्घाटनाचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात हलोरे हायस्कूलने विजय मिळविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बांडागळे यांनी केले.










