चिपळूण : चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष व चिपळूण नगर परिषदेचे माजी नगरसेवक संजयशेठ रेडीज यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू, समर्पित व बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. संजयशेठ रेडीज हे सहकार क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळखले जात. अनेक वर्षे त्यांनी चिपळूण अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत बँकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. पुढे त्यांनी अर्बन बँकेचे पालक म्हणूनही जबाबदारी निभावली. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही काही वर्षे कार्यरत होते.
नगरसेवक म्हणून त्यांनी चिपळूण नगर परिषदेच्या सभागृहात शहरातील विविध प्रश्न मांडत नागरिकांच्या अडचणींना वाचा फोडली. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली. तसेच वैश्य समाज संघटनेच्या विविध उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहिला. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.










