सुभाष पाकळे फाउंडेशनतर्फे सावर्डेत भव्य रक्तदान शिबिर

Edited by: मनोज पवार
Published on: September 21, 2025 16:13 PM
views 177  views

चिपळूण : जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा पाहता सावर्डे येथील सुभाष पाकळे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आदरणीय आमदार शेखरजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य रक्तदान शिबिर उद्योजक सचिन पाकळे व संजय पाकळे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते.

चिपळूण तालुक्यातील सुभाष पाकळे फाऊंडेशन सावर्डेचे  अध्यक्ष सचिन पाकळे यांनी गत वर्षी प्रमाणे यावर्षी  20 सप्टेंबर 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजित केले होते. हे शिबीर सावर्डे येथील मुंबई गोवा महामार्ग नायरा पेट्रोल पंपाशेजारी सचिन कात इंडस्ट्रीज येथे , सकाळी 10 ते दुपारी  2 या वेळेत पार पडले.     

जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढीत सध्या खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्व सामान्य रुग्णांना रक्ताची आबाळ  निर्माण झाली होती. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय यांच्या वतीने 'दान रक्ताचे वाचवूया प्राण रुग्णाचे' असे आवाहन करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात  कॅन्सर, सततचे अपघात आजाराचे प्रमाण वाढल्याने  शासकीय रक्तपेढीत तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सामाजिक संस्था मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय संस्था शासकीय कार्यालय याना रक्तदानाचे आवाहन करण्यात आले होते.

जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांचे सर्व डॉक्टर्स आणि टेक्निकल स्टाफ यांनी या रक्तदान शिबिरासाठी मोलाचे योगदान दिले, पंचक्रोशीतील 81 रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, तर ढाकमोलीच्या सरपंच भारती लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले, यावेळी उद्योजक संजय पाकळे, उद्योजक सचिन पाकळे, शेखर निकम प्रतिष्ठान कार्याध्यक्ष गणेश सावर्डेकर, शेखर निकम प्रतिष्ठान सचिव देवराज गरगटे, शेखर निकम प्रतिष्ठान उपाध्यक्ष उमेश राजेशिर्के, संतोष खैर, सावर्डे उपसरपंच जमीर मुल्लाजी,विजय भुवड, पूनम पाकळे , मेघा पाकळे आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी केल्यामुळे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी यांचे सचिन पाकळे यांनी मनापासून आभार मानले.