'पुढील पिढीला देऊ ज्ञान, वृक्ष लागवड राबवू' उपक्रम उत्साहात

Edited by: मनोज पवार
Published on: August 01, 2025 20:36 PM
views 26  views

चिपळूण : नारी सन्मान प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत कामथे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने "एक पेड माँ के नाम" या संकल्पनेअंतर्गत "पुढील पिढीला देऊ ज्ञान, वृक्ष लागवड राबवू" हा पर्यावरणपूरक उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कामथे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा क्र. २च्या आवारात आणि शेजारील निवडलेल्या जागेत या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण आणि रोपवाटप करण्यात आले.

कार्यक्रमास सरपंच सरस्वती हरेकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे स्थानिक प्रतिनिधी बाळासाहेब हरेकर, माजी उपाध्यक्ष  किरण हरेकर, ग्रामपंचायत सदस्या अन्विता हरेकर, समिती सदस्या अमृता हरेकर, मयुरी सन्नाक, शाळेचे मुख्याध्यापक बजरंग गुरसळे, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपक्रमात २०० झाडांची लागवड व १०० रोपांचे वाटप करण्यात आले. काजू, जांभूळ, आवळा, बहावा, करंज, कांचन, साग अशा स्थानिक व उपयोगी झाडांचा समावेश होता. या रोपांची उपलब्धता वन विभाग, चिपळूण व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयामार्फत मोफत करण्यात आली. रोपे लावण्यासाठी आवश्यक जागा श्री. बाळासाहेब हरेकर यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यांचा सन्मान नारी सन्मान प्रतिष्ठानचे विश्वस्त सल्लागार श्री. यशवंत पेढांबकर यांच्या हस्ते करण्यात आला.

उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले. यावेळी सरपंच सरस्वती हरेकर यांचा पर्यावरण स्नेही वृत्तीबद्दल सन्मान वृक्ष देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रियांका कारेकर, उपाध्यक्षा डॉ. अलका कोळेकर, सचिव तेजल पेढांबकर, व सल्लागार  यशवंत पेढांबकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

कारेकर यांनी सांगितले की, “वयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा-काॅलेजांमध्ये उपयुक्त उपक्रम घेण्याचा मानस असून, तेथेही वृक्षदानाची संकल्पना राबवली जाईल. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, झाडे लावा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा हा आमचा संदेश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत व शाळा प्रशासन यांचे सहकार्य लाभले. सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.