
चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी आयोजित चिपळूण तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. या कामगिरीमुळे आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
१४ वर्ष वयोगटात श्रेया नवनाथ सावंत हिने प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. स्वरा नटे, स्मित महाकाळ आणि आराध्य तटकरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत आपली चमक दाखवली. १७ वर्ष वयोगटात शर्विल चव्हाण, विनय भावसार, मैत्रेयी पुरोहित, प्रणाली पवार व मुग्धा यादव यांनी प्रत्येकी प्रथम क्रमांक मिळवत जोरदार कामगिरी केली. शिवम चव्हाणने द्वितीय, तर संघर्ष कदम व शुभ्रद काणेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील या यशस्वी कामगिरीनंतर विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक श्री. संजय बनसोडे, पर्यवेक्षिका सौ. रेवती कारदगे, क्रीडा विभाग प्रमुख श्री. समीर कालेकर, श्री. सोमनाथ सुरवसे आणि परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाने अभिनंदन करत उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.