चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा २००० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण !

संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांची माहिती
Edited by: मनोज पवार
Published on: August 06, 2024 13:35 PM
views 207  views

 चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने २ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला असल्याची माहिती चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी देतांना पंचवार्षिक संकल्पित आराखड्यानुसार मार्च २०२८ च्या संकल्प आराखड्यानुसार संस्थेचे नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले की, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने काम करुन केवळ ३१ वर्षाच्या कालखंडात २००० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करुन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. संस्थेच्या जुलै २०२४ अखेर ठेवी ११०७ कोटी २४ लाख एकूण कर्जव्यवहार ९०१ कोटी ९३ लाख त्यापैकी सोनेतारण कर्ज व ठेवतारण कर्ज ३७५ कोटी २५ लाख आहे. संस्थेच्या कार्यपध्दतीप्रमाणे दर पाच वर्षांचा संकल्प आराखडा तयार करण्यात येत असतो व त्याप्रमाणे तो पुर्णत्वास नेण्यासाठी अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने वर्षभर काम करण्यात येत असते व त्याचा आढावा घेतला जातो. संस्थेच्या मार्च २०२८ च्या संकल्प आराखड्यानुसार संस्थेच्या संकल्पीत ठेवी १८५० कोटी, कर्जे १४५५ कोटी, भाग भांडवल ९५ कोटी, निधी १७५ कोटी, एकूण स्वनिधी २७० कोटी व नफा ७० कोटी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असुन गेल्या ३० वर्षाच्या यशस्वीतेप्रमाणे या वेळीही संस्थेचे नियोजीत उदिष्ट पूर्ण करण्यात येईल असा विश्वास संस्थेचे चेअरमन  सुभाषराव चव्हाण यांनी व्यक्त केला.

 संस्थेच्या आर्थिक उद्दीष्ट पूर्ती बरोबरच सभासदांच्या आर्थिक विकासासाठीही संस्था नियोजनध्द पध्दतीने काम करीत असते. त्यासाठी स्वंयरोजगारातुन रोजगार निर्मितीवर अधिक भर दिला जातो. पुढील पाच वर्षासाठी मार्च २०२८ पर्यंत संस्थेच्या कार्यक्षेत्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवुन किमान २०,००० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कृषिपूरक व्यवसाय, पर्यटन व्यवसाय छोटया व्यावसाईकांना वेगवेगळया प्रशिक्षणातुन मार्गदर्शन करुन आत्मनिर्भर करण्यासाठी सातत्यपूर्ण काम करण्यात येणार असल्याची माहीती यावेळी दिली.