
कणकवली : मुंबई येथे झालेल्या ५०व्या आय.एन.टी. (इंडियन नॅशनल थिएटर) एकांकिका स्पर्धेत सिंधुदुर्गातील चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर यांनी उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक हा मानाचा किताब पटकावला.
या स्पर्धेत सादर झालेल्या 'मढं निघालं अनुदानाला' (दिग्दर्शक महेश कापरेकर व सागर चव्हाण) या एकांकिकेला परीक्षकांकडून उच्च दर्जाचे मानांकन मिळाले. सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या या नाटकाने प्रेक्षकांची दाद मिळवली. नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला असून दिग्दर्शक जोडीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारानेही गौरविण्यात आले. याशिवाय या एकांकिकेला मटा सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.
एकांकिकेतील प्रभावी मांडणी, ठसठशीत अभिनय, तसेच संगीतकार जोडीने दिलेल्या लाइव्ह संगीतामुळे या नाटकाने स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले. नाटकाच्या आशयाला अधोरेखित करणारे संगीत, गायन आणि वाद्यमेळ या जोडीने अचूक साधला होता.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अक्षय केळकर, अभिनेत्री पूर्निमा केंढे, रंगकर्मी राजेश वराडकर, दिग्दर्शक सिद्धार्थ साळवी, रामचंद्र गावकर, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार कांटे, सुजय हांडे, तन्वी बर्वे हे उपस्थित होते. चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर या कलाकारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव मोठे केले असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.