मुलांनी कौशल्य विकासाभिमुख शिक्षणाकडे वळावे : निरंजन डावखरे

Edited by: दिपेश परब
Published on: August 03, 2024 11:31 AM
views 385  views

वेंगुर्ला : शिक्षणाची परिभाषा टप्याटप्याने बदलत चालली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेले कौशल्य ओळखून पुढील क्षेत्र निवडले पाहिजे. विद्यार्थ्यांना जॉब ओरिएंटेड शिक्षण पुढील काळात भेटले पाहिजे हा दृष्टीकोन ठेऊन नवीन शैक्षणिक धोरण बनवले आहे. कौशल्य विकास वर जास्तीत जास्त भर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जात आहे. अनेक रोजगाराच्या संधी पुढील काळात सरकारकडून उपलब्ध होत असताना आपण स्वतः उद्योजक व्हायला हवं, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळाच्या वतीने याचे व्यासपीठ देण्याचे काम होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी नुसतं मेहनत करण्यापेक्षा कोणत्या क्षेत्रात जास्त करियरच्या संधी आहेत हे ओळखून वाटचाल करावी. असे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांनी वेंगुर्ले येथे केले. 

भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथील स्वामिनी मंडपम् येथे आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळ्याला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या सन्मान सोहळ्याचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून कोकण पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण , कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल , माजी नगराध्यक्ष राजन गिरप , खर्डेकर महाविद्यालय प्राचार्य डॉ. एम.बी.चौगले, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व ॲड. सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , माजी सभापती निलेश सामंत , जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत तालुक्यातील सर्व प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी तसेच पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि तालुक्यातील दहावी बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल देणाऱ्या प्रशालेतील मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला हायस्कूल च्या शिक्षिका विमल शिंगाडे यांचा स्वातंत्र्यवीर स्मृती आतंरराष्ट्रीय हिंदी गौरव सन्मान २०२४ मिळाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ला यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना ऍड निरंजन डावखरे म्हणाले की, कौशल्यविकासाच्या माध्यमातून विविध ट्रेडस मध्ये विद्यार्थ्यांना थेट रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नुकतेच केंद्राच्या बजेट मध्ये २० लाख तरुणांना पुढील ५ वर्षांमध्ये त्यांचे कौशल्य विकसित करुन त्यांना कुशल वर्कमॅनशिपच्या दृष्टीकोनातून तयार करण्याचे काम हे केंद्राच्या योजनेत आहे आणि त्याचबरोबर सुमारे ५०० कंपन्या केंद्राने निश्चित केल्या आहेत की, ज्यामध्ये जवळपास १ करोड पेक्षा जास्त तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. कोकणामध्ये फूड प्रोसेसिंगला मोठा वाव आहे. त्यांचे उत्पादनही खूप क्वालिटीयुक्त आहे. त्याला गरज आहे ती मार्केट उपलबध करून देण्याची आणि निश्चितपणे राज्य शासनाच्या माध्यमातून पुढील काळात या सर्व उत्पादनांना एक चांगल मार्केट उपलब्ध करून देण्यात येईल. उत्पादनांना योग्य भाव व लोकांपर्यंत पोचवण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्याचे काम मी निश्चितपणे कारेन असे आश्वासनही यावेळी आमदार डावखरे यांनी दिले. 

माजी आमदार राजन तेली यांनी आपला जिल्हा शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अग्रेसर असला तरी स्पर्धा परीक्षांमध्ये मागे का आहे, याविषयी भाष्य करीत भविष्यात सिंधुदुर्ग मधून प्रशासकीय अधिकारी तयार होतील असा आशावाद व्यक्त केला, तर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना दयानंद कुबल म्हणाले की, आता ढाल आणि तलवारीचा काळ बदलून, पेन व पुस्तकाचा काळ आला आहे. त्यामुळे मुलांना नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची गरज आहे. सतत मेहनत करणारा माणूस कधीही अपयशी होत नाही. त्यामुळे सतत मेहनत करा, वेळेचं महत्व पाळा आणि आपल्या कार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक असा करा की, मंगळावर जाणार पहिला विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातील असावा असे मार्गदर्शन त्यांनी केले.

यावेळी कोकण पदवीधर मतदार संघातून विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांचा वेंगुर्ला भाजपा च्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तसेच वेंगुर्ला तालुक्यातील विविध संस्थांनी डावखरे यांचा सन्मान करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडिस , माजी सभापती सारीका काळसेकर, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, नगरसेवक प्रशांत आपटे, महीला मोर्चाच्या श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, रसीका मठकर, आकांक्षा परब, मारुती दोडशानट्टी, समीर कुडाळकर, राजु सामंत, रफिक शेख, रविंद्र शिरसाठ, भुषण सारंग इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन परूळकर यांनी तर आभार प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मानले