भाऊ पांगम यांचा दातृत्व गुण मुलांनी आत्मसात करावा : अॅड. संदीप निंबाळकर

भाऊ पांगम यांच्या १४ व्या स्मृतीदिनी आठवणींना उजाळा
Edited by:
Published on: January 16, 2025 17:22 PM
views 186  views

सावंतवाडी : आरोस परिसरातील विद्यार्थी शाळेअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आनंद पांगम यांनी प्रतिकूल परीस्थितीत मुलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली हे कौतुकास्पद आहे. कोणताही राजाश्रय नसताना अशी संस्था सुरु करणे आणि ती चालवणे हे तितकस सोप नव्हत. 


भाऊ पांगम यांनी लावलेल्या या छोट्याश्या रोपट्याचे आज वटवृक्ष झालाय अनेक विद्यार्थी आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस या संस्थेच्या विद्या विहार इंग्लिश स्कूल या शाळेने घडवले. त्यावेळी भाऊंनी फक्त आपल्यापुरता विचार केला तर हे शक्य झालं नसत, त्यामुळे या  शाळेच्या विद्यार्थ्यांनीही याची जाणीव ठेवून मोठे झाल्यावर या शाळेला तसेच गोरगरीब जनतेला मदत करावी असं आवाहन अॅड. संदीप निंबाळकर यांनी केलं. आरोस शिक्षण प्रसारक मंडळ, आरोसच्या विद्या विहार इंग्लीश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत भाऊ पांगम यांच्या चौदाव्या स्मृतीदिनी प्रशालेत आयोजित खास कार्यक्रमात प्रमुख पाहुणे  ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष महादेव पांगम, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, संचालक शांताराम आरोलकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष आल्हाद नाईक, सदस्य प्रवीण मेस्त्री, गोकुळदास हळदणकर, चंद्रकांत दाभोलकर, धारगळकर, नंदा मोरजकर, रुपाली मोरजकर,  भाऊ पांगम यांच्या कन्या  विनया नानचे, विद्या गोवेकर, निशा रेवडेकर  आदि मान्य उपस्थित होते. 


यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाऊ पांगम यांच्या आठवणींना उजाळा दिला. भाऊ पांगम यांचे सुपुत्र महादेव पांगम यांनीही मुलांना मार्गदर्शन करत आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्वप्रथम भाऊ पांगम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.  विद्यार्थ्यांच्या सुमधुर स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, सूत्रसंचालन निलेश देऊलकर तर आभार सुषमा मांजरेकर यांनी मानले.