
वेंगुर्ला : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान‘ हे पुरस्कार राबविण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता पंचायत समिती स्तरावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणा-या ग्रामपंचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरीता उत्कृष्ठ काम करणा-या ग्रामपंचायतीस सन २०२५-२६ पासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान‘ हे पुरस्कार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असा आहे. सपूर्ण राज्यातील मुल्यांकनाच्या आधारे निवड झालेल्या ग्रामपंचायतींना सुमारे २४३ कोटी एवढ्या रक्कमेची पुरस्कारासाठी तरतुदी शासनस्तरावर करण्यात आलेली आहे.
सदर तालुकास्तर अभियानाच्या प्रभाग अंमलबजावणीसाठी दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वेंगुर्ला-भटवाडी येथील श्रीसिद्धिविनायक मंगल कार्यालयात वेंगुर्ला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सहाय्यक यांची एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी संबंधितांनी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले आहे.