मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा रुग्णांना आधार

रत्नागिरीतील 18 रुग्णांना 14 लाख 80 हजारांची मदत
Edited by:
Published on: August 05, 2025 11:53 AM
views 68  views

रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यासाठी उद्घाटन झालेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून 30 जूनअखेर एकूण  18 रुग्णांना 14 लाख 80 हजार इतकी मदत रक्कम वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयामार्फत अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना अर्थिक सहाय देता येते. रत्नागिरीतील नूतन प्रशासकीय इमारतीत पहिल्या मजल्यावर सुरु झालेल्या या कक्षाचे काम वैद्यकीय अधिकारी डॉ. जिज्ञा मो.क्र. 9403701837, अमित कोरगावकर मो. क्र. 9975354259 हे काम पाहतात. या योजनेसाठी रुग्णाचे उत्पन्न 1 लाख 60 हजार पेक्षा कमी असणे आवश्यक गरजेचे आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. मुख्यमंत्री प्रणालीवर नोंदणीकृत रुग्णालय आवश्यक आहे आणि त्यामध्ये तो उपचार घेत असावा. उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णास खर्चाची प्रतिपूर्ती अर्थ सहाय्य देण्यात  येत नाही. रुग्णाचे आजार मुख्यमंत्री सहाय्यता निधीने ठरवून दिलेल्या आजारांच्या यादीमध्ये बसला पाहिजे.

विहित नमुन्यातील अर्ज असावा. रुग्ण दाखल असल्याचा त्याचा जिओ टॅग फोटो असावा. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याद्वारे हे अंदाजपत्रक प्रमाणित करुन घेतलेले असावे. रुग्णाचे आधारकार्ड, लहान बालकांच्या बाबतीत मातेचे आधारकार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत एफआयआर रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णांसाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती या सर्व कागदपत्रांसह अर्थसहाय्याचे मागणी ऑनलाईन पध्दतीने अर्थात ई मेलद्वारे केलेली असल्यास मूळ अर्जासह सर्व कागदपत्रं एकत्रितरित्या वाचनीय अशा स्वरुपात पाठविण्यात यावेत.

या मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीसाठी aao.cmrf-mhgov.in हा ई मेल तसेच 18001232211 हा टोल फ्री क्रमांक आहे. ई मेल केल्यानंतर 24 तासात एम नंबर प्राप्त होतो व अर्जाची स्थिती कळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालये ही मुख्यमंत्री प्रणालीवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहेत.

जिल्ह्यातील 18  रुग्णांना देण्यात आलेल्या 14 लाख 80  हजार मदतनिधीमध्ये कमीत कमी 30  हजार आणि सर्वात जास्त 1 लाख अशा मदतनिधीचा समावेश आहे. सीएमआरएफ मध्ये 2  वर्षाखालील बालकांसाठी कोचलर इन्प्लांटसाठी 3 लाखांपर्यंत मदतनिधी देण्याची तरतूद आहे.

गरीब, वंचित, आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांनाही उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा प्रमुख उद्देश आहे. रुग्णांच्या आजारावर त्वरित निर्णय घेऊन निधी वितरण प्रक्रीयेत पारदर्शकता राखणे हा देखील या कक्षाचा उद्देश आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा गरजू रुग्णांसाठी एक प्रकारे नवसंजीवनी ठरत आहे.                                                                                                                                    प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते                                                                              जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी