
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) व आर.पी. आय महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपा पक्षाचे स्टार प्रचारक तथा गोवा राज्यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारासाठी येणार आहेत. याबाबत राज्याच्या महायुतीच्या कोअर कमिटीकडे मागणी करण्यात आली असून त्या अनुषंगाने नुकतीच दोडामार्ग तालुका शिवसेना प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी गोवा येथे त्यांची भेट घेऊन जिल्ह्यात आपल्या सभा झाल्यास युतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन होऊन युतीचे उमेदवार यांना फायदा होणार असल्याकडे लक्ष वेधले आहे.
गोवा सीएम डॉ. सावंत यांना याबाबत त्यांनी विनंती केली असून त्यांनी प्रथम दर्शनी होकार दर्शवीला असून वरिष्ठ पातळीवर याबाबत अंतिम प्लॅनिंग होणार असल्याची माहिती गणेशप्रसाद गवस यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग मध्ये कणकवली विधानसभा मतदासंघातील भाजपा आमदार नितेश राणे, कुडाळ मधून माजी खासदार कुडाळ विधानसभा उमेदवार डॉ. निलेश राणे आणि सावंतवाडी विधानसभा मतदासंघातुन दिपक केसरकर आदी तिन्ही महायुतीचे उमेदवार विधानसभा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याचे एक अनोख आपुलकी, रोजगार, उद्योग व्यवसाय या अनुषंगाने जवळच नातं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या सभा जिल्ह्यात झाल्यास त्याचा मोठा फायदा महायुतीला होणार आहे. या अनुषंगाने भाजपचे स्टार प्रचारक असलेले गोवा सीएम डॉ. सावंत यांनी प्रथम दर्शनी होकार दिला असल्याचं श्री. गवस यांनी स्पष्ट केलंय. याबाबत राज्यांचे महायुतीचे नेते याच्याशी वरिष्ठ पदाधिकारी चर्चा करून त्यांच्या प्रचाराचा अंतिम कार्यक्रम आखला जाणार असल्याचंहि त्यांनी सांगितलं आहे.
गोवा राज्यांचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना मानणारा मोठा युवा वर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील अनेक युवक गोव्यात नोकरी निमित्त येजा करीत असतात, तसेच सीमावर्ती परिसरातील गावात भाजपाचें मोठें प्राबल्य आहे. दोडामार्ग, बांदा, शिरोडा, रेडी, वेंगुर्ला भागात युतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना युतीच्या माध्यमातून या सभा झाल्यास त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं डॉ प्रमोद सावंत यांच्या सभा व्हाव्यात यासाठी शिवसेनेच्यावतीने भेट घेण्यात आली.यावेळी गणेश प्रसाद गवस यांचे समवेत युवा सेना तालुका प्रमुख भगवान गवस यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.