
वेंगुर्ला : छत्रपती शिवराय हे बहुजनांचे खरे प्रति पालक होते. अठरापगड जातींना न्याय देणारे जाणते राजे होते, स्वराज्याच्या एका सूत्रात त्यांनी बारा बलुतेदार, अठरा पगड जातींना न्याय दिला, शिवरायांची महती चंद्र सूर्य असेपर्यंत राहील, असे प्रतिपादन संत रोहिदास उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अनंत आसोलकर यांनी व्यक्त केले.शिरोडा - बांधवाडी (ता. वेंगुर्ला) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आसोली येथील संत रोहिदास उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने शिवजयंती जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अनंत आसोलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सचिव कृष्णा चव्हाण, खजिनदार प्रा. प्रतिभा चव्हाण, वेंगुर्ला तालुका चर्मकार समाजाचे अध्यक्ष उत्तम आर्लेकर, भाजप प्रणित एससी समाजाचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष महेश चव्हाण, अनिल चव्हाण, बबन शिरोडकर, यज्ञकांत शिरोडकर, बाबल चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रास्ताविक सादर करताना प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी सांगितले की, छत्रपती शिवराय रयतेचे खरे राजे होते. महिलांना न्याय देण्यासाठी शिवाजी महाराजांनी कठोर शासन केले. ते प्रचंड पराक्रमी, दूरदृष्टी व परोपकारी राजे होते.
यावेळी कार्यक्रमास बांधकरवाडीच्या नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती लाभली. यावेळी आप्पा चव्हाण, उर्मिला चव्हाण, विद्याधर शिरोडकर, अपर्णा चव्हाण, सोनाली चव्हाण यांच्यासह युवा वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन कृष्णा चव्हाण यांनी केले.