
वैभववाडी : ओटीपी विचारुन रेल्वे कर्मचारी भानुदास सातु गवस यांच्या बँक खात्यातुन साडेचार लाख रूपये अज्ञाताने काढल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला. एटीएममध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फायदा उठवत अज्ञाताने हा डाव साधला. याबाबत श्री. गवस यांनी वैभववाडी पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
कोकण रेल्वेत पर्यवेक्षक पदावर कार्यरत असलेले श्री. गवस वैभववाडीत रेल्वे वसाहतीत राहतात. ते मुळ दोडामार्ग येथील आहे. त्यांचे गोवा येथील बँक ऑफ बडोदा शाखेत बँक खाते आहे. याच बँकेचे त्यांच्याकडे एटीएम असुन ११ डिसेंबरला एटीएमचा वापर करून त्यांनी पाच हजार रूपये रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. परंतु एटीएममधुन पैसे न येतात खात्यातुन रक्कम कमी झाली होती. असा प्रकार दोनदा झाला होता. त्याबाबत त्यांनी बडोदा बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांशी सपंर्क साधुन तक्रार नोंदविली होती. दरम्यान श्री.गवस हे आज राजापुर येथे कार्यरत असताना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण बडोदा बँकेतुन बोलत असल्याचे सांगीतले. ग्राहक सेवा केंद्रात तक्रार केल्याची दखल घेत आपल्याला फोन आला असेल असे समजुन श्री.गवस त्या व्यक्तीशी बोलत होते. त्याने देखील तुमच्या एटीएममध्ये दोष असल्याचे सांगत ते सुरू करण्यासाठी बँक डिटेल देण्यास सांगीतले. श्री.गवस रेल्वे कॉलनीत आल्यानंतर त्यांना पुन्हा त्या व्यक्तीचा फोन आला. श्री.गवस यांनी बँक डिेटेल दिल्यानंतर त्यांना कस्टमर बॉब सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगीतले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर त्या व्यक्तीने मागुन घेतला. दोनदा ओटीपी घेतल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने श्री.गवस यांच्या खात्यातुन तीन टप्प्यात साडेचार लाख रूपये काढले. त्यांच्या खात्यातुन रक्कम काढल्यानंतर ते हडबडुन गेले. त्यांनी तत्काळ सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर त्यांनी आज सायकांळी वैभववाडी पोलीसांत फसवणुकीची तक्रार दिली.
पोलीसांनी अज्ञातविरोधात फसवणुक आणि माहीती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. बँक ग्राहकांना अज्ञात व्यक्ती मोबाईलवरून फोन करून त्यांच्याकडुन एटीएम नंबर,पिन कोड,बँक डिेटेल,पिनकोडची मागणी करतात. याशिवाय काही ॲप डाऊनलोड करण्यास सांगुन देखील ओटीपी क्रमांक घेवुन अज्ञाताकडुन फसवणुक केली जाते. अज्ञात व्यक्तीकडुन आलेले फोनवर किवा मेसेजवर जनतेने विश्वास ठेवु नये. फसवणुक टाळण्यासाठी थेट बँकेशी सपंर्क साधावा, अस आवाहन वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे.