सिंधुदुर्गात 16 ते 17 मार्चला अवकाळी पावसाची शक्यता

काजू, आंबा उत्पादकांचं टेंशन वाढणार
Edited by: ब्युरो
Published on: March 15, 2023 11:26 AM
views 193  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 16 ते 17 मार्च दरम्यान सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. असा अंदाज ग्रामीण कृषी मौसम सेवा उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेकडून व्यक्त करण्यात आलाय. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता मुख्यत्वेकरून जिल्ह्याच्या पूर्वेकडील सह्याद्री घाट माथ्याकडून सुरूवात होत अंतर्गत भागातही प्रभाव असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 काजू, आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता 

ऐन काजू, आंबा तयार होण्याच्या कालावधीतच या पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यात आंबा पिकासाठी जी फळे काढण्यास तयार झालेली असतील अशा ठिकाणी दोन दिवसांत सकाळच्या सत्रात उन नसताना काढणी करावी. परिपक्व काजू बी व बोंडूची वेचणी करून बी बोंडूपासून वेगळे करून काजू बी स्वच्छ पाण्याने धुवावी व पाऊस गेल्यावर उन्हामध्ये तीन दिवस वाळवावी. तसेच पाळीव जनावरे, कोंबडी, शेतकरी यांनीही सुरक्षीत ठिकाणी आसरा घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदेचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर यशवंत मुठाळ यांनी म्हटले आहे.

ऐन आंबा, काजूच्या सिझनमध्येच अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याने अगोदरच अडचणीत सापडलेला शेतकरी आणखीन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.