
प्रमोद तरळ
मुंबई : कोकणवासीयांच्या सामाजिक विकासासाठी सन १९९९ मध्ये स्थापन झालेल्या कोकण कट्टा विलेपार्ले या संस्थेचा २३ वा वर्धापन दिन दीनानाथ नाट्यगृहात नुकताच पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सहा मान्यवरांना 'कोकण रत्न २०२२ पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. ज्यामध्ये आरोग्य सेवा डॉ. बाळासाहेब ढेरे (पालशेत, गुहागर) सामाजिक क्षेत्र जीवन आनंद संस्थेचे संदीप परब ( पणदूर, ता. कुडाळ), कलावंत अनिल गवस, यशस्वी उद्योजक दीपक नाईक आणि विक्रमी रक्तदाता सुरेश रेवणकर यांना पुरस्कार देण्यात आले.
ख्यातनाम गायक सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, कलावंत संदीप चोणकर, माजी आमदार गुरुनाथ देसाई, सेवाई संस्था मार्गदर्शक संदीप दळवी, स्वामी समर्थ हडपिड मठाचे विश्वस्त नंदकुमार पेडणेकर, सुरश्री संगीत केंद्राचे सर्वेसर्वा अनिल देसाई या मान्यवरांच्या उपस्थितीत हजारो नागरिकांच्या साक्षीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे व निवेदक समर्थ म्हात्रे आणि कोकणकट्टा सदस्य यांनी कोकण कट्ट्याचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला.
याप्रसंगी श्री स्वामी समर्थ विलेपार्ले मठ, सेवाई संस्था, मुंबईचा पेशवा, स्वामी हडपिड मठ, वात्सल्य ट्रस्ट, ग्राम संवर्धन, वंकास डहाणू ग्रामस्थ, नाना शंकरशेट प्रतिष्ठान, वीर सावरकर सेवा केंद्र, पार्ले वेल्फेअर आणि तमाम पार्लेकर यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सुरश्री संगीत शिक्षण संस्थेच्या सर्व सदस्यांनी मनोरंजनाचा कार्यक्रम अप्रतिम केला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थापक अजित पितळे, सचिव सुनिल वनकुंद्रे, दादा गावडे, खजिनदार सुजीत कदम, विवेक वैद्य, हर्षल धराधर, आत्माराम डीके, प्रथमेश पवार आदि सदस्य यांनी मेहनत घेतली.