
सावंतवाडी : काजू बी खरेदी प्रकरणी विद्यमान मंत्री दीपक केसरकर आणि सत्ताधारी भाजप शिंदेसेना सरकारने बहुसंख्य काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.जिथे प्रति किलो २०० रुपये मागणी होती तिथे १२५ रूपये अधिक १० रुपये अनुदान असे मोजकेच १३५ रूपये प्रति किलो जाहीर करून सामान्य काजू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असे शिवसेना उबाठाचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.
या संदर्भात त्यांनी प्रेस नोट प्रसारित केली आहे. ते म्हणाले की, मोजक्या काजू कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील अडीच लाख काजू शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक करण्यात आलेली आहे. एकेकाळी (आठ दहा वर्षापूर्वी) काजू बी ला १८० रुपये प्रति किलो भाव मिळत असताना मोदी सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात नितीमुळे आयात कर अचानकपणे दहा टक्क्यांवरून पाच टक्के केला गेला आणि फार मोठ्या प्रमाणावर परदेशी काजू देशात येऊ लागला आणि काजू व्यापाऱ्यांचे तर उखळ पांढरे झाले पण दोन एकरपेक्षा कमी बागायत असलेला बहुसंख्य काजू शेतकरी मात्र देशोधडीला लागला आहे.
जिल्ह्यातील काजू शेतकरी आज कर्जबाजारी होत असताना त्याचे परदेशी काजूच्या अतिक्रमणामुळे सातत्याने आर्थिक शोषण होत आहे.या सगळ्या प्रकरणात जिल्ह्याचे पालकमंत्री गप्प आहेत. आजच्या महागाईच्या काळात सामान्य काजू शेतकऱ्याला प्रति किलो दोनशे रुपये भाव मिळणे हा त्याचा हक्क आहे. परंतु मुठभर काजू कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे हित जपणाऱ्या सत्ताधाऱ्यांना निवडणूक लढण्यासाठी सामान्य काजू शेतकऱ्यापेक्षा धनदांडगे व्यापारीच महत्त्वाचे वाटत असल्याचे त्यांनी या प्रेस नोटमध्ये नमूद केले आहे.