विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 28, 2025 11:52 AM
views 712  views

देवगड : देवगड तालुक्यातील रहाटेश्वर कालवीवाडी येथील विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी येथील सुधीर रमेश ठुकरुल यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी १.५० वा.च्या सुमारास करण्यात आली.

विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याप्रकरणी रहाटेश्वर कालवीवाडी येथील सुधीर रमेश ठुकरुल (४९) या संशयिताला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गच्या पथकाने पकडले.ही कारवाई मंगळवारी दुपारी १.५० वा.च्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, रामचंद्र शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार प्रकाश कदम, अमर कांडर यांच्या पथकाने रहाटेश्वर कालवीवाडी येथे छापा टाकला.  तेथील रहाटेश्वर घोडेखिंड भागातील अशोक कदम यांच्या काजू बागेतील काजूच्या झाडाखाली पालापाचोळ्यामध्ये संशयित सुधीर ठुकरुल याने विनापरवाना लपवून ठेवलेली ठासणीची बंदूक आढळली. पथकाने ही बंदूक ताब्यात घेतली. संशयित सुधीर ठुकरुल हा अशोक कदम यांच्या बागेमध्ये देखभालीचे काम करतो. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.या फिर्यादीनुसार संशयित सुधीर ठुकरुल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.