कामगाराच्या मृत्यूप्रकरणी 'त्या' ठेकेदारावर गुन्हा

Edited by:
Published on: February 02, 2025 18:30 PM
views 304  views

मालवण : शहरातील बांगीवाडा येथे काम सुरू असलेल्या कॉम्प्लेक्सच्या इमारतीवरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. या कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी या कॉम्प्लेक्सच्या कामाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. राम आशिष मौर्या असे कॉन्ट्रॅक्टरचे नाव आहे. रोहितकुमार विश्राम चौधरी असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना १४ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून तपासाअंती २८ जानेवारी रोजी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. यात पोलिसांनीच फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हयात म्हटले आहे, १४ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता मालवण बांगीवाडा येथील समर्थ ऐश्वर्या या नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावर रोहितकुमार विश्राम चौधरी हा काम करत असताना इमारतीचा कॉन्ट्रॅक्टर राम आशिष मौर्या याने त्याच्या तसेच अन्य कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही. त्यांना हेल्मेट न पुरविता, इमारतीस बाहेरील बाजूने संरक्षण जाळी न बसविता, कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून, त्यांना कामाचे योग्य मार्गदर्शन व देखरेख न ठेवता निष्काळजीपणे काम सुरू ठेवले. त्यामुळे रोहितकुमार हा इमारतीच्या आठव्या मजल्यावर बाहेरील बाजूने काम करत असताना लाकडी फळी मोडल्याने जमिनीवर पडल्याने गंभीर दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला होता. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार मिळाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शविच्छेदन अहवालात रक्तस्त्राव झाल्याने रोहितकुमारचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. आकस्मिक मृत्यू दाखल करताना सेंटरिंगचे काम करत असताना सेफ्टी बेल्ट निसटून आठव्या मजल्यावरून खाली जमिनीवर पडून त्याच्या डोकीवर, हनुवटीवर व शरीरावर मोठ्या जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. मात्र, तपासात लाकडी फळी तुटल्याने जमिनीवर पडून त्याचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास टेंबुलकर करीत आहेत.