पाट अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन बाईक चालक आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल
Edited by:
Published on: March 16, 2025 20:39 PM
views 621  views

कुडाळ : पाट तिठा येथे डंपर व मोटारसायकल यांच्यात आज सकाळी 6.40 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात पाट हायस्कूलची विद्यार्थीनी मनस्वी सुरेश मेतर (वय 16, रा.निवती मेढा, ता.वेंगुर्ले) हि डंपर खाली सापडून जागीच ठार झाली. तर मोटारसायकलस्वार जखमी झाला. मनस्वीचा उद्या सोमवारी दहावीचा शेवटचा पेपर होता. ती क्लास साठी मोटारसायकलच्या मागे बसून जात असताना तिचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी डंपर चालक, अल्पवयीन मोटरसायकल चालक आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हकिगत अशी की, मनस्वी ही पाट विद्यालय मध्ये दहावीत शिक्षण घेत होती. सध्या दहावीचा परीक्षा चालू असून, उद्या सोमवारी दहावीचा शेवटचा पेपर होता. ती हायस्कूल मध्ये क्लास साठी जात होती. हुमरमळा येथील तिच्या ओळखीतील मुलाने तिला म्हापण येथे आपल्या ताब्यातील पॅशन प्रो मोटारसायकलवर डबलसीट बसवून दोघेही व्हाया पाट तिठा येथून कुंभारवाडी मार्गे पाट हायस्कूल मध्ये जात होते. त्याचवेळेस परूळेहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या डंपरला मोटारसायकलची जोरदार धडक बसली. यात मोटरसायकलसह दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात मनस्वी ही डंपरच्या मागील चाकाखाली गेली. तिला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. जखमी मोटारसायकलस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. निवती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप शेटये, सुनील सावंत व विक्रांत लोणे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दरम्यान, निवती - पाट पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी निवती पोलिस ठाण्यात धडक देत, अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली. या अपघाताची खबर योगेश उल्हास मेतर (रा.निवती मेढा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार या अपघात प्रकरणी सोळा वर्षीय मोटारसायकलस्वार मुलगा, तसेच तो अज्ञान असतानाही व त्याच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला गाडी चालविण्यास दिल्याने त्याचे वडील  आणि डंपर चालक अशा तिघांवर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती निवती पोलीसांनी दिली.