कुंभवडेतील एकाश्मस्तंभ स्मारकाच्या जतनासाठी किरण सामंतांचा पुढाकार

सिंधुदुर्गातील कातळशिल्पांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष कधी वळणार ?
Edited by: विनायक गांवस
Published on: January 29, 2025 15:35 PM
views 392  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातत्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी संशोधन केलेल्या कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी राजापूर-लांजा-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्गातील कातळशिल्पांच्या जतनासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कधी पावले उचलणार, असा प्रश्न गेली २४ वर्षे कातळशिल्पांवर संशोधन करणारे श्री. लळीत यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथील आढळलेल्या एकाश्मस्तंभ स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासह त्याठिकाणी मुलभूत सुविधांच्या उभारणीचा प्रस्ताव प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गंत शासनाला सादर करण्याचे आमदार श्री. सामंत यांनी रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांना सूचित केले आहे. त्या माध्यमातून आता कोकणच्या प्राचीन इतिहासाचा उलगडा करणार्‍या एकाश्मस्तंभाचे जतन आणि संवर्धन होणार आहे.

इसपू १५०० ते ४०० वर्षे हा महापाषाण संस्कृतीचा (मेगालिथिक कल्चर) काळ मानला जात असून हा मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा कालखंड मानला जात आहे. याच काळातील एकाश्मस्तंभ कातळशिल्प संशोधक श्री. लळीत यांनी केलेल्या संशोधनामध्ये तालुक्यातील कुंभवडे येथे आढळून आले आहेत. हे सात एकाश्मस्तंभ श्री गंभीरेश्वर मंदिर (गांगो मंदिर) परिसरात आहेत. 


महापाषाणकालीन एकाश्मस्तंभ महापाषाण काळात पश्‍चिम किनारपट्टीवर वसलेल्या मानवी समुहांच्या, तत्कालीन संस्कृतींच्या चालीरीती, श्रद्धा, उपासना पद्धती यांच्या अभ्यासात महत्वाचा दुवा ठरणार असल्याने त्यांचे शासनाने जतन अन् संवर्धन करताना ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारके म्हणून जाहीर करावीत अशी अपेक्षा संशोधक श्री. लळीत यांनी व्यक्त केली होती. याची दखल घेत आमदार श्री. सामंत यांनी या एकाश्मस्तंभांच्या जतन आणि संवर्धनासह या ठिकाणी मुलभूत सोयीसुविधांच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे.

श्री. लळीत यांनी ६ मे २००१ रोजी मालवण तालुक्यातील हिवाळे येथील पहिल्या कातळशिल्प ठिकाणाचा शोध लावला. त्यांनतर कुडोपी, खोटले अशा कित्येक साईट उजेडात आणून त्यांना प्रसिद्धी दिली. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, राजस्थानसह अनेक राज्यात राष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले. कातळशिल्पे या विषयावरील एकमेव ग्रंथही प्रसिद्ध केला. 'युनेस्को'ने मालवण तालुक्यातील कुडोपी ठिकाणाचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केला. देशविदेशातील कित्येक पर्यटक या कातळशिल्पांना भेट देतात. मात्र गेल्या २४ वर्षात लोकप्रतिनिधींनी या अमुल्य मानवी वारशाची दखलही घेतलेली नाही. आमदार किरण सामंत यांचा आदर्श घेऊन आतातरी लोकप्रतिनिधी हा विषय ऐरणीवर घेतील का? असा सवाल श्री. लळीत यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी अनेकदा मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, चिरेखाणी, डंपरची वाहतूक, रस्ते यामुळे कित्येक कातळशिल्पे नष्ट झाल्याची खंतही  श्री. लळीत यांनी व्यक्त केली.