कॅरम समर कॅम्पला सावंतवाडीत सुरूवात

Edited by: विनायक गावस
Published on: June 05, 2023 12:01 PM
views 57  views

सावंतवाडी : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड पुरस्कृत समर कॅरम कोचिंग कॅम्प १ ते ६ जून २०२३ दरम्यान कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे सुरु आहे.सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनने आयोजित केलेला हा पाचवा कोचिंग कॅम्प आहे. या कॅम्पसाठी इंडियन ऑईलचे प्रतिनिधित्व करणारे विश्वविजेते पदाची हॅट्रिक केलेले पुणे येथील कॅरम लिजंड योगेश परदेशी मार्गदर्शन करण्यासाठी सावंतवाडी येथे आले आहेत.

गुरुवार १ जून रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅम्पचे उद्धाटन झाले. यावेळी व्यासपिठावर सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अॅड अवधूत भणगे, सदस्य हेमंत वालकर, मालवण आणि विश्वविजेता कॅरम खेळाडू श्री योगेश परदेशी उपस्थित होते.

या कॅम्पसाठी जिल्ह्यातून व अन्य सुमारे ३५ राष्ट्रीय ज्युनिअर खेळाडू तसेच अन्य नवोदित भावी चॅम्पीयन्स उपस्थित आहेत. सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत या सर्व मुलांना कॅरमचे धडे देण्यात येतात. प्रत्यक्ष विश्वविजेत्या जेष्ठ खेळाडूकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन मिळत असल्याने सहभागी खेळाडू देखील अतिशय उत्साहाने कॅम्पचा उपयोग करून घेताना दिसत आहेत.

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनने देखील यावेळी कॅम्पचे आयोजन करताना खेळाडूंच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने शनिवार ३ रोजी दुपारी कुडाळ येथिल प्रतिथयश फिजिओथेरपीस्ट डॉ. चैताली प्रभू यांच्या दोन तासांच्या मार्गदर्शनाचे सेशन देखिल आयोजित केले. यावेळी डॉ प्रभू यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे कॅरम खेळाडूंसाठी आवश्यक रोजचे व्यायाम, प्रत्यक्ष सामन्याआधी करावयाचे व्यायाम तसेच सामन्यादरम्यान उपयोगी पडू शकणारे व्यायाम अशी विस्तृत माहिती दिली. यावेळी खेळाडू तसेच पालकांनी देखील शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले.

या कॅम्प दरम्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय कॅरम पंच श्री आशिष बागकर, वेंगुर्ला, राष्ट्रीय पंच . अमेय पेडणेकर, कुडाळ यांनी वेळोवेळी खेळाडूंना कॅरमच्या नियमांबद्दल विस्तृत माहिती दिली.

कॅम्पमधे प्रोजेक्टर द्वारे महाराष्ट्र कॅरम असो.च्या यू ट्यूब चॅनलवरील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सामन्यांबाबत खेळाडू व मार्गदर्शक असा परिसंवाद आयोजित केला. विविध वृत्तपत्र तसेच खाजगी वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी कॅम्पच्चा ठिकाणी भेट देऊन या कामाची दखल घेतली.

विश्वविजेता कॅरम खेळाडू योगेश परदेशी यांनी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या कॅम्पच्चा कल्पक व निटनेटक्या आयोजनाला दाद दिली. मागील काही वर्षांपासून सिंधुदुर्ग मधील कॅरम खेळाडूंवर घेतलेल्या परिश्रमांचे आज चीज होताना दिसत आहे. सावंतावडी येथील उदयोन्मुख राष्ट्रीय कॅरम खेळाडू केशर निर्गुण हिने ज्युनिअर गटामधे देशात तीसरे मानांकन मिळवले व ओ एन् जी सी या ऑईल कंपनीची स्पोर्टस् स्कॉलरशीप देखील मिळवल्याबद्दल तिचे विशेष कौतुक केले. नजिकच्या कालावधीत जिल्ह्यातील काही अन्य निवडक खेळाडू याप्रकारची कामागिरी नक्की करतील असा परदेशी यांना विश्वास आहे.