शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी : मंत्री नितेश राणे

Edited by:
Published on: February 10, 2025 19:09 PM
views 121  views

मुंबई : राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मालवण येथे  उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतन पुतळ्या बाबत आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री राणे बोलत होते. 

पुतळा उभारणीच्या कामाची सविस्तर माहिती घेऊन मंत्री श्री राणे म्हणाले की, या कामामध्ये त्रुटी नसाव्यात. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. राजकोट बंदर येथील हवामान आणि वाऱ्याचा वेग याचा पूर्ण अभ्यास करून त्याप्रमाणे स्ट्रक्चर उभे करावे. यासाठी कोणतीही घाई करण्यात येऊ नये. पुढील किमान एक हजार वर्ष टिकेल असा हा पुतळा उभा करावा, असे मंत्री श्री राणे म्हणाले. 

पुतळा उभारताना एकूण तीन आधार या पुतळ्याला देण्यात येत आहेत. पायापासून वरपर्यंत अखंड सपोर्ट असणार आहेत. सी 90300 ब्राँझ धातूचा वापर करण्यात येत आहे. हात आणि तलवार यांच्या मजबुतीसाठी केबल वापरण्यात येत असल्याची माहिती शिल्पकार अनिल राम सुतार यांनी दिली. 

बैठकीस सार्वजनिक बांधकाम कोकण प्रादेशिक विभागाचे  मुख्य अभियंता शरद राजभोज, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिव दीपाली घोरपडे, सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, आयआयटी पवईचे तज्ज्ञ आर. एस. जांगिड आदी उपस्थित होते.