
वैभववाडी : करुळ घाटात महादेव मंदीरानजीक थांबलेल्या कारने पेट घेतला. हा प्रकार शुक्रवारी रात्री ८च्या दरम्यान घडला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे या दुर्घटनेतून प्रवासी बचावले. मात्र कार पुर्णतः जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे घाटातील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी माणगाव,ता.हातकणंगले येथील चारजण कामानिमित्त काल (ता.२)शुक्रवारी वैभववाडीत आले होते. येथील काम आटपून हे सर्वजण सायंकाळी साडेसात वाजणेच्या सुमारास वैभववाडी येथून कोल्हापूरकडे जाण्यास निघाले. करुळ घाट संपल्यावर गगनबावडा यापासून एक किमी अंतरावर महादेव मंदीरानजीक ही गाडी आली असता ती अचानक बंद झाली. चालकाने गाडीबाहेर येऊन पाहीले असता, गाडीच्या इंजिनकडील भागातून धूर येत असल्याचे दिसले. चालकाने गाडीतील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. तोपर्यंत गाडीच्या पुढील भागात आगीने पेट घेतला.त्याने गाडीवर पाणी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे ती आटोक्यात आली नाही.
या दरम्यान गगनबावडा ते तळेरे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या पाण्याचा टँकर बोलविण्यात आला. त्यांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. दरम्यान या घटनेमुळे करूळ घाटातील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर आग विझली.त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.