
सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांनी भाजप सोडत मातोश्रीवर उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर सावंतवाडी येथील शिवसेना शाखेत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडीचे उमेदवार हे राजन तेली असतील असे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांना यावेळी जाहीर केले.
मातोश्रीवर उबाठा शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजन तेली यांनी प्रवेश केला. यानंतर शनिवारी सावंतवाडी येथील शाखेत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. राजन तेली तुम आगे बढो...अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. ढोल ताशांच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी करत तेलींचे स्वागत करण्यात आले. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी म्हणाले, ही जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून शिवसेनेचा उमेदवार दिला जाईल. संध्याकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. राजन तेली हे आमचे उमेदवार असतील व संपूर्ण सहकार्य त्यांना आमचं राहील असे मत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, उबाठाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, शब्बीर मणियार, शैलैश गवंडळकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.