राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी सावंतवाडी टर्मिनस बाबतीत जाहीर बोलावं : अॅड. संदीप निंबाळकर

Edited by: विनायक गावस
Published on: April 07, 2024 11:18 AM
views 133  views

सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून २६ जानेवारीला उपोषण केले त्यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मोबाईलवरून बोलताना प्रा. मधू दंडवते यांचे नाव देता येणार नाही. मात्र, अन्य सर्व प्रवासी संघटनेच्या प्रश्नांची उकल होईल असे म्हटले होते. मात्र राणे आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष केले. एकाही लोकप्रतिनिधीनं रेल्वेमंत्र्यांची भेट घडवून दिली नाही. त्यामुळे आता लोकसभा निवडणूकीत सावंतवाडी टर्मिनसला उघड पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत. त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी सावंतवाडी टर्मिनस बाबतीत जाहीर बोलावं, जाहीरनाम्यात रेल्वे स्थानक टर्मिनस विषय घ्यावा असं आवाहन करत रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर व सचिव मिहीर मठकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील अपूर्ण टर्मिनसच काम पूर्ण व्हावं आणि प्रा. मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे म्हणून आंदोलन छेडले त्यावेळी आश्वासन मिळाली. पण, एकाही लोकप्रतिनिधीने रेल्वेमंत्र्यांची भेट घडवून दिली नाही. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी अपयशी ठरले असे ते म्हणाले. याप्रसंगी सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सचिव मिहीर मठकर, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, अँड सायली दुभाषी, भूषण बांदीवडेकर,सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट,सिध्देश सावंत आदी उपस्थित होते.

प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर म्हणाले, माजी आमदार कै. जयानंद मठकर यांचा स्मृतिदिन आहे. कै. मठकर व कै. डी. के. सावंत यांनी रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रयत्न केले. सारे प्रश्न लक्षात घेता लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार घालावा का ? अशी चर्चा आहे. सावंतवाडी टर्मिनसबाबतीत टाळाटाळ केली जात आहे. लोकांना गैरसोयीचा प्रवास करावा लागतो आहे. भारतीय रेल्वेत कोकण रेल्वे विलीनीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे त्यासाठी सरकारची भूमिका काय आहे. कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी चर्चा झाली पाहिजे. अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला. 

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर म्हणाले, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला छुपा विरोध केला जातो आणि पाठिंबाही दिला जातोय. हे ओळखून निवडणूक जाहिरनाम्यामध्ये कोकण रेल्वे बाबतीत भूमिका घ्यावी. टर्मिनस ला पैसे नाहीत तर शक्तीपीठ मार्गाला पैसे आहेत ? शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता आहे किंवा नाही याची चर्चा झाली पाहिजे. मुंबई रेल्वे स्थानकावर नाव बदलून देण्याची तयारी दाखवली जाते. पण, प्रा. मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला देण्यास विरोध होतो. प्रा. मधू दंडवते व नाथ पै यांचे नाव भाषणात घेतले जाते. पण टर्मिनसला नाव देण्यास विरोध केला जातो. रेल्वेमंत्री भेट घडवून आणतो असे आश्वासन देऊन सत्तेतील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला नाही. खासदार विनायक राऊत यांनी निवेदन सरकार दरबारी पोहचवली असे अँड निंबाळकर यांनी सांगितले. ते म्हणाले,टर्मिनससाठी आंदोलन छेडले गेले, टर्मिनस भूमिपूजन झाले आणि नऊ वर्ष रखडले आहे. टर्मिनसला विरोध आणि बाजू घेणारे आज एकत्र आहेत.

रेल्वेमंत्री यांना भेटल्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आश्वासन दिले होते. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत आहे याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.